धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पज्जरी, भाविक व अन्य व्यक्तींची लेखी नोंद घेतली जाणार आहे. सुरक्षा व इतर कारणाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सुचना केल्याने मंदीर संस्थानने हा निर्णय घेतला आहे, यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार असुन सुसुत्रता येणार आहे. तुळजापूर येथील उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे मंदिरातील पुरातन सोने चांदी घोटाळ्याचा तपास करीत आहेत, त्या दरम्यान मंदीर व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दिसून आल्याने नोंदी घेण्याचे आदेश देशमुख यांनी दिले आहेत. गाभाऱ्यात मनमानी प्रवेश केला जात असल्याची बाब लक्षात आल्याने ही उपाययोजना केली जात आहे.
सिंहासन पुजा व अभिषेक वेळ वगळता इतर वेळी मंदीर प्रवेश करणाऱ्याच्या नोंदी घेतली जातील शिवाय तुळजाभवानी देवीचा पुरातन व नियमित दागिने, खजिना उघडताना पोलीस यांना कळविणे व त्यांची उपस्थितीती बंधनकारक असणार आहे. मंदिरातील पुरातन दागिने चोरी गेले आहेत तर काही दागिने बदल केले आहेत.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करणारे व्यक्तींची नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात येणार आहे. चोपदार दरवाजा येथे ही नोंद घेण्यात येणार आहे. प्रक्षाळ व चरणतीर्थ पुजेवेळी गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली जाणार आहे याबाबतचे पत्रक मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी – वाडकर यांनी काढले आहे.