धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शुद्ध तुपाचा बुंदीचा लाडू प्रसाद म्हणुन देण्यात येणार असुन या बाबतची निविदा मंदीर संस्थानने प्रसिद्ध केली आहे. निविदा प्रसिद्ध केल्याने या निर्णयाला आता मुर्त स्वरूप येणार असुन लवकरच लाडू प्रसाद वाटपाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी निविदा काढली आहे. 25 ऑक्टोबर पर्यंत इच्छुक कंत्राटदार व पुरवठाधारक निविदा भरू शकतात.
तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त तुळजापुरात येतात त्यावेळी त्यांना इतर देवस्थानच्या धर्तीवर प्रसाद देण्याचा मंदीर संस्थानचा विचार होता त्यादृष्टीने मंदीर संस्थानच्या बैठकीत जानेवारी महिन्यात निर्णय घेण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने शिर्डी, तिरुपती, सिद्धिविनायक आदी देवस्थान यांचा दौरा केला होता, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.इतर देवस्थान प्रमाणे लाडू आता तुळजाभवानी देवस्थानचा ब्रँड बनणार आहे.