धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता अखेर पुरग्रस्त शेतकरी यांच्या मदतीला व हाकेला धावून आली असुन पुरग्रस्ताना मदत म्हणुन 1 कोटी रुपयांचा निधी मंदीर संस्थाने जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हा निधी सरकारला दिला जाणार असुन त्या व्यतिरिक्त थेट जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना शैक्षणिक व संसार उपयोगी वस्तु स्वरूपात, पुनर्वसन करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा आहे. मंदीर संस्थानकडे जवळपास 260 कोटींच्या ठेवी आहेत.
तुळजाभवानी मंदीर संस्थान कोल्हापूरसह इतर ठिकाणी पुर नैसर्गिक आपत्ती आली की पैसे देते, मात्र धाराशिव जिल्ह्यात कधी नव्हे ते संकट आल्यावर मदत निधी देत नाही, त्यामुळे संस्थान टिकेचे ‘धनी’ बनले होते. तुळजापूर सांस्कृतिक महोत्सवाला लाखो रुपये मानधन देऊन कलाकार बोलवून जवळपास 8 कोटी रुपये खर्च करीत आहे यावर दैनिक समय सारथीने प्रकाश टाकत दुटप्पी भुमिकेवर टीका करताच मंदीर संस्थाने 1 कोटी जाहीर केले आहेत शिवाय मंदीर संस्थान साड्या सुद्धा देणार आहे.
पूरग्रस्तांचे दुःख आमचे दुख आहे. भक्तांच्या अश्रूंना हात पुसणे हीच आमच्या देवीची शिकवण आहे. समाजोपयोगी कार्यासाठी मंदिर संस्थान सदैव तत्पर राहील असे जिल्हाधिकारी यांनी म्हण्टले आहे. किर्ती किरण पुजार यांच्या या निर्णयामुळे पुरग्रस्ताना हक्काची व लवकर मदत मिळणार आहे, त्याबद्दल शेतकरी जिल्हाधिकारी व मंदीर संस्थानचे आभार मानत आहे. मंदिराच्या सर्व विश्वस्त यांची ‘नाहरकत’ घ्यायला ‘वेळ’ लागल्याने कदाचित मदतीच्या घोषणेला उशीर झाला असावा.

धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी डान्स व्हिडीओ प्रकरणात जर कोणाच्या ‘भावना’ दुखावल्या असतील तर प्रसिद्धी पत्रकाद्वारे ‘दिलगिरी’ व्यक्त करून वादावर ‘पडदा’ टाकला होत मात्र तुळजापूर सांस्कृतीक नवरात्र महोत्सवाच्या अवाढव्य खर्चाबाबत ‘मौन’ बाळगले होते. तुळजाभवानी मंदीर संस्थान अर्थात तुळजाभवानी पुरग्रस्ताच्या मदतीला धावणार का ? या विषयाला मात्र जिल्हाधिकारी यांनी बगल दिली होती, याबाबत दैनिक समय सारथीने वृत्त प्रसिद्ध केले होते. शेतकरी यांनी सुद्धा मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती.
अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे.शेतातलं पीक वाहून गेली, जनावरांचे हाल झाले,अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आणि असंख्य कुटुंबे बेघर झाली.अशा संकटाच्या काळात श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराने हात पुढे करून हजारो पूरग्रस्तांच्या डोळ्यात दिलासा आणला आहे. 1 कोटींचा निधी तात्काळ शासनाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गेल्या वर्षीही अतिवृष्टीच्या काळात मंदिर संस्थानने २५ लाख रुपयांची मदत दिली होती.परंपरेप्रमाणे, संकटाच्या काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान समाजकार्याचे व्रत अखंडपणे पार पाडत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले,जनावरांचा चारा गेला,घरांची पडझड झाली.या सर्व परिस्थितीत ‘आई तुळजाभवानी ’च्या मंदिरातून आलेली 1 कोटी रुपयांची मदत ही फक्त आर्थिक नाही,तर पूरग्रस्तांना भावनिक आधाराची देणगी आहे.
आई तुळजाभवानी संकटात नेहमीच आपल्या लेकरांना धीर देत आली आहे.हे योगदानही त्याच मायेचा एक भाग आहे,” असे सांगत संस्थानने पूरग्रस्तांसोबत एकात्मता व्यक्त केली.