तुळजापूर – समय सारथी
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील दर्शन मंडपाच्या प्रस्तावित जागेचा वाद अखेर मिटला असून पुजारी, व्यापारी व नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर व सूचनेनुसार मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दर्शन मंडप हा शहाजी राजे महाद्वारजवळ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्याचा निर्णय प्रारूप आराखड्यात घेण्यात आला, त्याला नागरिकांनी विरोध करून एक दिवस तुळजापूर शहर बंद केले होते.
जाहीर करण्यात आलेला विकास आराखडा हा अंतिम नव्हता, लोकांच्या सूचना मागविल्या होत्या असे असताना कारण नसताना काही लोकांनी गैरसमज करून घेतला , लोकांच्या सूचना व इच्छा लक्षात घेता दर्शन मंडप हा महाद्वार जवळ केला जाईल, त्यासाठी लागणारे तांत्रिक दृष्ट्या नियोजन केले जाईल असे आमदार पाटील म्हणाले.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील टोळभैरव दरवाजा उघडण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त असलेले आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्याशी याबाबत चर्चा झाली निर्णय झाल्याचे सांगितले. सुरक्षेचे व एटीएस या तपास यंत्रणेचे कारण पुढे करीत हा दरवाजा गेली अनेक वर्ष कुलूपबंद होता, हा दरवाजा उघडल्यानंतर भाविक यांची सोय होणार असून गर्दीवर नियंत्रण आणणे सोपे होणार आहे.