तुळजापुर – समय सारथी, नंदकिशोर नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कालभैरव देवाचा अग्नीचा भेंडोळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .दरवर्षी दिवाळीच्या अमावास्येला भारतात उत्तरेत तीर्थक्षेत्र काशी आणि दक्षिणेत तुळजापूर या दोनच ठिकाणी अश्या प्रकारचा भेंडोळी उत्सव साजरा केला जातो त्यामुळ या उत्सवाच मोठ धार्मिक महत्व आहे.
वर्षभरात केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केला जाणारा कालभैरव देवाचा भेंडोळी उत्सव तुळजापुरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तुळजापुरात अग्नीची तर काशी येथे फुलांची भेंडोळी काढली जाते
तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठापैकी एक असल्याबरोबर देशातील अनेक घराण्याची कुलस्वामिनी आहे. कालभैरवसह इतर सात भैरव हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे भाऊ आहेत . तुळजापुरात काळभैरवासह टोळभैरव व इतर भैरवांची मंदिरे आहेत . काशीनंतर फक्त तुळजाभवानी येथे सर्व भैरवांची मंदिरे आहेत.
सर्व ९ ग्रहांच्या अनुकुलतेसाठी व वर्षभरात कळत नकळत केलेल्या चुका आणि पापातून मुक्ती मिळावी यासाठी काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक भेंडोळी उत्सवात साजरा केला जातो या उत्साहात अनेक भाविक सहभागी झाले होते. तुळजाभवानी व कालभैरव यांची या उत्सवात वर्षातून एकदा भेट होते हि भक्तांची धारणा आहे.
एका लांब लाकडी दांडक्याला केळी,चिंच,आंबा व इतर वृक्षांची पाने गुंडाळी जातात. या लाकडाच्या मधोमध तेलात बुडवलेले कापड लावले जाते त्याला पेटवून लाकडाच्या दोन्ही बाजु खांद्यावर घेवून भेंडोळीची मिरवणूक कालभैरव मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत काढण्यात येते . तुळजापुरातील पुजारी हे लाकूड दोन्ही बाजूला धरत अश्या प्रकारे तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभारयात देवी चरणी घेवून जात आशीर्वाद घेतात.
तुळजाभवानी मातेच्या वार्षिक उत्सवापैकी भेंडोळी उत्सव हा महत्वाचा उत्सव असल्यामुळे देशभरातील भाविक हा उत्सव पाहण्यासाठी व काळभैरवाचे दर्शन घेवून पाप मुक्ती करण्यासाठी तुळजापुरात गर्दी करतात.भेंडोळी उत्सवानंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन उत्सवाची सांगता करण्यात आली.
देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते, ही परंपरा आजही जोपासली जाते.
भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात पण या भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही, काळभैरवाला काशीचाही कोतवाल म्हटले जाते.मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात.
अश्विन अमावस्येला भेंडोळीबरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत वर्षातून एकदा या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात, त्यानंतर ते वर्षभर देवीच्या दर्शनाला येत नाहीत.