नर्तिका पुजा जेलमध्ये तर केंद्र सुरु करण्यासाठी ‘धावपळ’ – पोलिस व प्रशासनाची भुमीका आता महत्वाची
धाराशिव – समय सारथी
तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याच्या जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर हे प्रकरण काढून घेण्यात आले त्यानंतर आता हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे महसूल आयुक्त यांच्याकडे जाणार आहे, अपील केल्यानंतर निर्धारीत वेळेत हे प्रकरण निकाली काढावे असे उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सचिन देशमुख यांनी आदेशात म्हण्टले आहे.
उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात नर्तिका पुजा गायकवाड हिचे नाव आल्यानंतर तुळजाई हे कला केंद्र राज्यभर चर्चेत आले होते. ‘मालकीण’ परंपरा अनं संपत्ती लुट, ब्लॅकमेल व आत्महत्या असे हे चक्र होते. पुजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिला जामीन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल असा युक्तिवाद केल्यानंतर सोलापूर कोर्टाने तिचा जामीन नाकारल्याने ती सध्या कारागृहात आहे तर दुसरीकडे तुळजाई कला केंद्र सुरु करण्यासाठी कायदेशीर पर्याय वापरत ‘धावपळ’ सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असे आदेश धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काढले होते त्या आदेशाला कला केंद्र चालक असलेल्या विजया अंधारे यांनी अपील करीत आव्हान दिले आहे. या कला केंद्र विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत, पोलिस अधीक्षक रितु खोखर, तहसीलदार यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी यांनी परवाना रद्द केला आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कला केंद्र विषयात ठोस भुमिका घेतली आहे.
परवाना रद्द केल्यानंतर सुद्धा तुळजाई कला केंद्राची ‘दबंगगिरी’ सुरूच होती. तक्रार केल्याचा राग मनात धरून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्या प्रकरणी निलेश जोगदंड, सुशांत उंदरे,धनंजय मोटे व गणेश मोटे यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सगळ्या बाबी सुनावणी वेळी महत्वाच्या ठरणार असुन तो निर्णय आयुक्ताकडे टिकतो का ? हे पाहावे लागेल. पोलिस व महसूल विभागाचा अहवाल, म्हणणे यात महत्वाचे असणार आहे. या केंद्रावरून इतर केंद्राची ‘दिशा’ ठरणार आहे.
उपसरपंच बर्गे व पुजा हिचे प्रेम संबंध याच कला केंद्रवर बहरले व नंतर वाद टोकाला गेला. आत्महत्यापुर्वी बर्गे हे पुजाला भेटायला तुळजाई कला केंद्रावर आले होते त्यावेळी तिने भेटायला बर्गे यांना नकार दिला, वाद झाला आणि बर्गे यांनी तिथून पुजाच्या घरी आईकडे जाऊन सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळील सासुरे येथे डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी पुजा तुळजाई कला केंद्रात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
उच्च न्यायालयातून हे प्रकरण इतर पर्याय असल्याचे कारण सांगत काढून घेण्यात आले, विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर निर्धारीत वेळेत 4 आठवड्यात हे प्रकरण निकाली काढावे असे उच्च न्यायालयाने म्हण्टले आहे.
तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली होती त्या आधारे परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.
तुळजाई कला केंद्र व पुजा गायकवाड, आत्महत्यानंतर कला केंद्राचा विषय ऐरणीवर आला. दैनिक समय सारथी वृत्त पत्राने बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला. अनेक कला केंद्रात प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘मालक – मालकीण’ या परंपरेच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट केली जाते. अनेकांचे संसार अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका असे 5 केंद्र बंद केले असुन साई व पिंजरा सील केले आहे. महाकाली या केंद्रचा परवाना रद्द करण्याचा पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असुन या कला केंद्र बाबत प्रकरण कोर्टात असुन तिथे शपथपत्र दिले जाणार आहे.
बर्गे हे तुळजाई कला केंद्र येथील नर्तिका पुजा गायकवाड हिचेकडे जात असल्यामुळे, त्यांची ओळख होवून, ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले होते. पुजा हिने बर्गे यांना अट घातली होती की, “मी तुमची आज पासुन मालकीण म्हणुन काम करते परंतु तुम्ही माझे घरखर्च व माझा घरसंसार पाहायचा”. सदर प्रेमसंबंध सुरू असताना, नर्तिकी पुजा गायकवाड हिने स्वतःसाठी व तिचे नातेवाईकांसाठी महागडे मोबाईल, बुलेट गाडी, घराचे बांधकाम वैराग येथे प्लॉट, नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन, सोने नाणे इत्यादी गोष्टी प्रेमाच्या जाळयात अडकवून, गोविंद बर्गे यांच्याकडून प्राप्त करून घेतल्या.
गोविंद बर्गे यांनी गेवराईत मोठया हौशेने मोठा बंगला बांधला होता, हे पुजाला समजल्यानंतर तिने सदरचा बंगला बघण्याचा हट्ट धरला आणि तिला तो बंगला आवडल्याने, सदर बंगला तिच्या नावावर करण्याचा तगादा तिने गोविंद बर्गे यांच्याकडे सुरू केला. सदर बंगल्याची माहिती गोविंद बर्गे यांच्या संपूर्ण कुटुंबास असल्याने, सदरचा बंगला पुजा गायकवाड हिचे नावावर करण्यास नकार देवून, दुसरा बंगला घेवून देण्याचे आश्वासन गोविंद बर्गे यांनी तिला दिले. तरी सुध्दा, नर्तिकी पुजा गायकवाड हिने सदरचा बंगला तिचे नावावर करण्याचा तगादा लावून गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. घटनेच्या 15 दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांचा मोबाईल ब्लॉक करून, बंगला नावावर करण्याचा आणि 5 एकर शेती घेवून देण्याचा आग्रह त्यांचेकडे धरला आणि ते न दिल्यास, गोविंद बर्गे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि अचानकपणे बोलणे बंद केले.