धाराशिव – समय सारथी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व अर्चना पाटील यांचे पुत्र मेघ हे गेल्या काही महिन्यात सक्रीय राजकारण व समाजकारणात उतरले असुन त्यांच्या नेतृत्वात तेरणा युथ फाउंडेशन स्थापन करण्यात आले आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन 9 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता राजे शहाजी महाद्वार येथे याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. युवकांनी युवकांसाठी उभी केलेली अभिनव सामाजिक चळवळ असे ब्रीदवाक्य असुन यानिमित्ताने मेघ पाटील हे या संस्थेचा कारभार पाहणार आहेत.
राणाजगजीतसिंह पाटील यांनी सुद्धा आमदार, मंत्री होण्यापुर्वी राणाजगजीतसिंह पाटील युवा प्रतिष्ठान याची स्थापना केली होती व त्यावेळी सक्रीय युवकांची फौज तयार केली होती त्यातून त्यांना बरे पैकी राजकीय व सामाजिज यश आले होते, आजही आमदार पाटील यांचा राजकीय कारभार प्रतिष्ठान भवन धाराशिव येथूनच चालतो. तोच पॅटर्न आता दुसऱ्या पिढीत राबवीला जात असुन मेघ यांचे तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून लॉंचिंग केले जात आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील हे अगोदरच सक्रीय राजकारणात असुन त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा हाती घेत सभा, बैठका घेऊन रोखठोक आरोप करुन मैदान गाजविले आहे त्यानंतर त्यांचे बंधु मेघ हेही आता मैदानात उतरले आहेत. विविध सामाजिक कार्यक्रम, विवाह सोहळे याला ते उपस्थिती राहत होते. नुकतेच मल्हार पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिनी विधीमंडळाची केकमधील प्रतिकृती तयार करण्यात आली होती, त्यानिमित्ताने ते आमदार होण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले होते.
मेघ व मल्हार ही जोडी सध्या धाराशिवच्या राजकारणात सक्रीय असुन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे त्यातून तरुणांचे संघटन बांधणी केली जात आहे.