धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सरसवली आहे. तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून 51 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक दानशूर मदतीला पुढे येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या आरोग्य सेवेला तत्पर असणाऱ्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यामुळे आपत्तीग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी हातभार लागला जाणार आहे असे पाटील म्हणाले.
तुळजाभवानी मंदीर ट्रस्ट 1 कोटी व तेरणा ट्रस्ट 51 लाख असे 1 कोटी 51 लाख मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असुन याची संयुक्त घोषणा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली. तुळजाभवानी मंदीर ट्रस्टचे आमदार पाटील हे विश्वस्त असुन त्यांचे या 1 कोटी मुख्यमंत्री निधी जाहीर करण्याबाबत मार्गदर्शन लाभले. या दोन्ही निधीमुळे मुख्यमंत्री सहायता निधीत वाढ होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना व अतीव नुकसान झालेल्या कुटुंबांना विशेष मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपणही ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी पुढं येऊन आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.