काळु बाळुच्या लढाईत शेतकरी देशोधडीला, हप्ते घेणे व जनतेला फसवायचे बंद करा – लोकांनी जाब विचारावा
ढोकी – समय सारथी
भैरवनाथ उद्योग समुह तेरणा कारखाना विकत घेणार अश्या वाड्यात उठवल्या जात आहेत मात्र तेरणा भाडे कायम तत्वावरच राहणार आणि 25 वर्षानंतर तो सभासद यांच्या मालकीचा राहणार, भैरवनाथ उद्योग समुह तो विकत घेणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या साक्षीने दिली. कारखाना 36 हजार सभासद यांच्या मालकीचा आहे, कारखाना कोणाच्या बापाचा नाही, आम्ही भैरवनाथ समुह ऐक निमित्त मात्र आहे. जिल्हा बँकेने कारखाना विक्रीचा प्रस्ताव दिला होता मात्र तेरणा कोणी विकु शकत नाही असे पत्र मी दिले व विरोध केला त्यामुळे हा कारखाना सभासद यांच्या मालकीचा राहणार आहे. गेल्या गाळप हंगामात 2 हजार 825 इतका विक्रमी भाव दिला, मी सर्वापेक्षा 25 रुपये जास्त भाव दिला मात्र यावेळी सगळ्यापेक्षा 51 रुपये जास्त भाव देणार आहे अशी घोषणा मंत्री सावंत यांनी केली, या घोषणेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना कोणाच्या दारात उसासाठी जावे लागणार नाही असेही सावंत म्हणाले.
समुद्रे परिवाराने पायात चप्पल न घालता कारखाना उभा केला मात्र त्यानंतर त्यांचे अस्तित्व ठेवले नाही असे सावंत म्हणाले. तेरणा कारखाना येथे तब्बल 12 वर्षानंतर शेतकरी, सभासद यांचा स्नेह संवाद मेळावा संपन्न झाला, या मेळाव्यात मंत्री सावंत यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी विकासाचा मुद्दा लावुन धरत समाचार घेत चौफेर टीका केली. यावेळी धनंजय सावंत, केशव सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
खासदार आमदार यांनी काय विकास केला हे दाखवावे, त्यांनी 2 विकासाची कामे सांगावी असे आव्हान मंत्री सावंत यांनी दिले. या लोकांना आमदार खासदार मीच केले, माझ्या भुम परंडा वाशी मतदार संघात अनेक विकास कामे झाली. रस्ते, पाणी इतर कामे झाली मात्र यांनी काय केले ते सांगावे. हरितक्रांती, धवल, उद्योग क्रांती करू असे सांगितले मात्र काही केले नाही आज हे एकमेकांना नावे ठेवतील, कोणाच्या कर्तृत्वाने झाले याचे देणेघेणे नाही. वाईट झाले हे पाप कोणीच मान्य करणार नाही. शेतकरी देशोधडीला लागला, नुकसान झाले. दुध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईला आली आहे, हे कोणी वाटोळे केले याचे उत्तर द्यावे असे सावंत म्हणाले.
दोघांनी ऐकमेकांवर शिंतोडे उडवायचे मात्र ही काळु बाळुची लढाई आहे, दोघे ऐकमेका विरोधात बोलतात, ते एकाच लायकीचे आहेत, तुमच्या घरातील भांडणामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या घरात का आणता ? शेतकऱ्यांना देशोधडीला का लावता. तीन तीन पिढ्या हेच सुरु आहे, हे थांबायला पाहिजे, शेतकऱ्यांनी याचा जाब विचारला पाहिजे की विकासाचे काय केले ? असे म्हणत मंत्री सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
तेरणा कारखाना सुरु करायला 2 वर्ष वाया का गेले. कशासाठी पळापळ सुरु होती, इतका कळवळा शेतकरी यांचा होता तर रात्री बेरात्री लातुर, मुंबई, दिल्लीला जाऊन भेटले, इतकी मेहनत कारखाना सुरु करायला घेतली असती तर कारखाना सुरु झाला असता असे सावंत म्हणाले. शेतकरी यांचे रक्त पिऊन पुणे मुंबई येथे संपत्ती उभी केली त्यामुळे त्यांची मुले तिथे आहेत व आपली मुले तिथे कष्ट करतात, हे कुठेतरी थांबले पाहिजेत असे सावंत म्हणाले. हप्ते गोळा करणे बंद करा असे ते म्हणाले.
वावड्या उठवायला काही लोक हुशार असतात, आपल्याला शांत जगायचे असेल तर काही जन वावड्या उठवतात त्यामुळे शेतकऱ्यांनी जागे होण्याची गरज आहे. शेतकरी भोळा भाबडा आहे, तो त्याला बळी पडतो व त्याचे नुकसान होते. संविधान बदलणार, मुस्लिम लोकांना बाहेर काढणार अश्या अफ़वा पसरविण्यात आल्या, 3 महिने झाले मोदी सरकार आले त्यांनी काही बदल केले नाही.
मंत्री, खासदार, आमदार हे जनतेचे सेवक आहेत, ते मतासाठी लाचार असतात मात्र आपण मतदार राजा आहेत हे जनता विसरली आहे त्यामुळे लोकांनी त्यांना जाब विचारायला पाहिजे. विकास पाहायचा असेल तर भुम परंडा येथे या आणि काही चुकलं असेल तर सुचना करा, तुम्ही जाब विचारा तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, मी पाठीशी आहे असे सावंत म्हणाले प्रथम नागरिक म्हणुन अमोल पापा समुद्रे यांनी ढोकीकराच्या वतीने स्वागत करीत सत्कार केला त्यानंतर सभासद,व्यापारी, शेतकरी, वारकरी यांच्या वतीने मंत्री तानाजीराव सावंत यांचा सत्कार केला. तेरणा बचाव संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी यांचा मंत्री सावंत यांनी सत्कार करीत आभार मानले. महायुतीच्या उमेदवाराला निवडुन द्या, चुकीच्या उमेदवार याच्या मागे राहू नका असे आवाहन सावंत यांनी केले. यावेळी शिवसेना पक्षात मंत्री सावंत यांच्या हस्ते पक्षप्रवेश देण्यात आले.