धाराशिव – समय सारथी
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषि विभाग सतत निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहे.या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे “तेरणा व्हॅली फर्टीलायझर अँण्ड केमिकल” नावाने बनावट खत निर्मिती कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय भरारी पथकाने धडक तपासणी केली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. महादेव आसलकर यांच्या आदेशानुसार भरारी पथकप्रमुख श्री. एन.एम.पाटील (कृषी विकास अधिकारी,जि.प.धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली श्री.प्रविण पाटील,श्री. व्ही.एम.भुतेकर,श्री.डी.व्ही.मुळे,श्री. आबासाहेब देशमुख,श्री.दीपक गरगडे, श्री.जी.पी.बनसोडे आदी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली.तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने सविस्तर अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.त्यानंतर कृषि आयुक्तालयातील परवाना अधिकारी तथा कृषि संचालक (नि.व.गु.नि.) यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणीनंतर तेरणा व्हॅली फर्टीलायझर अँण्ड केमिकल या कंपनीचा खत निर्मिती परवाना तसेच खत विक्री परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. यापुढेही अशा कारखान्यांवर व विक्रेत्यांवर तपासणी सुरू राहणार असून,दोषी आढळल्यास बियाणे/खते/किटकनाशके कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी खते,बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फक्त अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच खरेदी करावी.खरेदीवेळी पक्की पावती,ई-पॉस मशीनचे बिल आणि खताच्या बॅगवरील किंमतीशी ताळमेळ तपासावा.
बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व अंतिम मुदत पाहून घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे टॅग,पिशवी व थोडा नमुना हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवावा.शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावणाऱ्या कोणत्याही बनावट व बेकायदेशीर कृत्यांवर विभागाकडून कठोर कारवाई सुरूच राहील,असेही प्रभारी अधिक्षक कृषि अधिकारी एम.के. आसलकर यांनी सांगितले.