तेरणा बनला आधार – आरक्षण लढा सुरु असेपर्यंत राहणार पाठीशी, 5 हजार आंदोलकांच्या राहण्याची सोय
धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. या लढ्यात प्रत्येक जन आपआपल्या परीने कर्तव्य करीत योगदान देत असुन जबाबदारी पार पाडत आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील हे मदतीसाठी मैदानात उतरले असुन ‘तेरणा’ च्या माध्यमातून मदत करीत आहेत. नियोजनासाठी मराठा स्वयंसेवकांची टीम तयार करण्यात आली असुन दिवस रात्र पाटील पिता पुत्र यावर व्यवस्था करण्यासाठी लक्ष ठेवून आहेत.

नवी मुंबई येथील नेरुळच्या तेरणा विद्यालय आणि जुनिअर कॉलेज परिसरात मराठा बांधवांची राहण्याची, जेवणाची आणि वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहेच मात्र रोज वाढत असलेली संख्या, त्यात पावसाचे दिवस असल्याने आता एकाच वेळी पाच ते सहा हजार समाज बांधवांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी वेगात काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या मैदानात वॉटरफ्रूफ डोंब उभारला जात आहे
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हजारो मराठा शिलेदारांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था तेरणा परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल झालेल्या बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील व मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात तेरणा परिवाराने मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.
नेरूळमधील तेरणा परिवाराचे सदस्य धाराशिवमधून आलेल्या आपल्या गावाकडच्या मराठा बांधवांसाठी ज्या प्रकारे पुढे सरसावले आहेत, ती खरोखरच हृदयाला स्पर्श करणारी भावना आहे. धाराशिव जिल्ह्यातून शेकडो किलोमीटर दूर मुंबईत आलेल्या बांधवांना स्वतःच्या घरून जेवण बनवून देत आपल्या माणसांची काळजी ते घेत आहेत. संघर्षाच्या वाटचालीत ही आपुलकीची सावली मिळणं म्हणजेच खरी ताकद आहे.