तहसीलदार यांनी दिले मुख्याधिकारी यांना लेखी आदेश – नप केव्हा मुहूर्त साधणार, भुमाफियाला लगाम
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील जनता बँक समोरील सर्वे नंबर 239 व 240 मध्ये बांगड यांनी बांधलेले कॉम्प्लेक्स अनधिकृत ठरवित ते काढून टाकण्याचे आदेश तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी नागर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांना दिले आहेत, तसेच ही जागा शासकीय असल्याचे आदेश दिले आहेतत्यामुळे आता नगर परिषद केव्हा कारवाई करणार हे पाहावे लागेल.या प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी व माजी नगरसेवक उदयसिंह निंबाळकर यांनी तक्रार दिली होती त्यानंतर यात चौकशी करण्यात आली.
रामचंद्र बांगड यांनी सदर मिळकतीबाबत मालकी घोषित करुन निरंतर मनाई हुकूम मिळणेबाबत नगर परिषद मुख्याधिकारी याचे विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता त्यात बांगड यांच्या विरोधात निकाल दिला होता. नंतर त्यांनी पुन्हा कोर्टात अर्ज केला होता मात्र त्यात कोर्टाने कोणतेही आदेश पारित केले नाहीत किंवा दावा पुनस्थापित केलेला नाही.
सदरील जागेवरील अतिक्रमण हे नगर परिषद हद्दीतील असुन धाराशिव नप हद्दीतील सर्वे नंबर 239 व 240 या सरकारी जमिनीवरील आहे. बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण बांधकाम निष्काशीत करण्यासाठी तहसीलदार बिडवे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांना प्राधिकृत केले आहे तसेच हे अतिक्रमण तातडीने काढून टाकून त्याच्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जमिनीचा अनधिकृत वापर बंद करण्याची नोटीस देऊनही विकास काम बंद न केल्याने रामचंद्र दगडूलाल बांगड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी या जागेचे प्रकरण बाहेर काढत भुमाफियाचा भांडाफोड केला होता. त्यावेळी ही जागा शासकीय असल्याचे समोर आले होते.शहरातील मुख्य रस्त्यावर जनता बँकेच्या समोर मोक्याच्या ठिकाणी ही जागा असुन ती हडप करण्याचा घाट रचला जात आहे त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यात लक्ष देण्याची मागणी होत आहे.