धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असुन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना लेखी निवेदन देत कामबंद आंदोलन करीत मागणी केली आहे. आमचा दप्तर तपासणी किंवा इतर बाबींना कोणताही विरोध नाही, ती प्रशासकीय बाब आहे मात्र ज्या पद्धतीने डव्हळे यांनी अपमानस्पद वागणूक दिली त्याला विरोध आहे. कोणत्या व्यक्तीला नव्हे प्रवृत्तीला विरोध आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिली. ज्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आला आहे त्यावर कर्मचारी खुलासा, कागदपत्रे देत असतानाही त्यांना धमकावण्यात आले व कारवाईची भीती घालण्यात आली हे चुकीचे आहे. कोणतेही चुकीचे काम केले नसुन जिल्हाधिकारी यांनी इतर अधिकारी मार्फत शहानिशा करावी असे त्या म्हणाल्या.
उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचेकडून तपासणीवेळी अपमानास्पद वागणूक दिली, एसीबी कारवाईची धमकी देण्यात आली. कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कर्मचारी दहशतीमध्ये व मानसिक त्रासामध्ये आहेत. त्यामुळे याचा कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे असा आरोप अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. डव्हळे यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी अथवा आमच्या अधिकारी व कर्मचारी यांची बदली अन्य ठिकाणी बदली करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.