धाराशिव / भुम – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील निपाणी येथे मराठा आरक्षणाचा बळी गेला असुन प्रवीण काकासाहेब घोडके (वय ३८ वर्षे ) या युवकाने स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. प्रवीण हा मराठा आरक्षणाच्या चळवळीतील सक्रिय सदस्य होता आत्महत्या केल्यानंतर त्याच्या खिशात एकच मिशन मराठा आरक्षण,एक मराठा लाख मराठा असा मजकुर लिहिलेली चिठ्ठी सापडली असल्याची माहीती निकटवर्तीयांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरु असताना काही तरुण आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत सरकारचा निषेध करीत आहेत.आरक्षण मिळाले तर येणाऱ्या पिढीची प्रगती होईल यासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भावना मराठा समाज बांधवांची आहे. मराठा समाजाला आरक्षण हे आजच्या काळाची गरज बनलेली आहे.
प्रवीणच्या पश्चात्य पत्नी,एक मुलगा,दोन मुली,वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे प्रवीण घोडके याची तीन मुले पोरकी झाली असुन आधार कायमचा संपला आहे. तीन मुले आणि सासू-सासरे यांचा सांभाळ कसा करायचा हाच जन्मभराचा प्रश्न प्रवीण याच्या पत्नीसमोर उभा राहिला आहे.
मराठा आरक्षणाचा लढा लढताना तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन सकल मराठा समाजाकडुन करण्यात येत आहे.