जामीनीचा जल्लोष, पोस्ट अंगलट – दैनिक समय सारथीची बातमी व पोलिसांचे कोर्टात शपथपत्र
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम येथील फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमुर्तीच्या खंडपीठाने काही निरीक्षणे नोंदवित आदेश दिल्याने सुरेश कांबळे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. 19 जानेवारीपासुन येत्या 4 आठवड्यात कोर्टात शरण होण्याचे (सरेंडर) आदेश दिले आहेत. आत्महत्याच्या गुन्ह्यात कांबळे यांना अटकपुर्व जामीन देण्यासाठी कोणताही ठोस आधार वाटत नाही, त्यामुळे त्यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्यात येतो व त्यांना भुम येथील कोर्टात सरेंडर होण्याचे आदेश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती एम एम सुंद्रेश व एस व्ही एन भट्टी या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.आत्महत्या प्रकरणात सुरेश कांबळे यांचा सहभाग, उपलब्ध असलेले पुरावे व तात्पुरता दिलासा दिल्यानंतर सुरेश कांबळे यांनी केलेले जल्लोषाचे गैरवर्तन सरकारी वकील व भुम पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. कांबळे यांच्यावर आजवर दाखल गुन्ह्यांची जंत्री कोर्टात सादर केली.
दैनिक समय सारथी वृत्तपत्राने केलेली बातमी, सुरेश कांबळे यांनी फेसबुकवर टाकलेले व्हिडिओ व फोटो कोर्टात सादर करण्यात आले त्यानंतर उपलब्ध कागदपत्रे पाहून कोर्टाने जामीन रद्द करीत शरण येण्याचे आदेश दिले, ते शरण झाल्यावर ट्रायल कोर्ट कांबळे यांनी मांडलेल्या मुद्याचा विचार करेल असे नमूद केले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केले, त्यात अनेक बाबी नमूद केल्याने जामीन नाकारला.
भुम येथील 30 वर्षीय फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी सुरेश कांबळे यांना 6 महिन्यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजुर केला, त्यानंतर त्यांच्या समर्थक, चाहत्यांनी गावोंगावी त्यांची टॅक्टरवरून मिरवणूक काढली व जेसीबीने फुलांची उधळण करीत जल्लोष केला गेला. सुरेश भाऊंचा हा नवीन पॅटर्न धाराशिव जिल्ह्यात चांगलाच गाजला यावर टीकाही झाली. पोलिसांनी कोर्टात वस्तुस्तिथीवर शपथपत्र सादर केले त्यामुळे तात्पुरता जामीन रद्द झाला.
साम, दाम, दंड भेद..सिंघम, सरकार राज अश्या गाण्याच्या सुचक संदेश देणाऱ्या रिल्स व जल्लोषाचे फोटो, व्हिडिओ स्वतः सुरेश कांबळे यांनी सोशल मीडियावर टाकल्या होत्या त्या चांगल्याच अंगलट आल्याचे दिसते. ना मंत्री,ना खासदार,ना आमदार,ना साखर कारखान्याचा वा बँकेचा चेअरमन हे तर जनतेचे प्रेम असे सांगत सुरेश भाऊ यांनी जल्लोषाचे फोटो, व्हिडिओ, रिल्स पोस्ट केले होते.
काय आहे आत्महत्या प्रकरण –
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी,अर्चना स्वामी,यश स्वामी व सुरेश कांबळे यांच्या मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कलम 306,323,504,506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपीच्या अटकेसह एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई या मागणीसाठी भुम येथील गोलाई चौकात रस्ता रोको करीत निषेध केला त्यावेळी 10 दिवसात आरोपीना अटक करण्याचे आश्वासन दिले मात्र तब्बल 6 महिने भाऊ फरार होते.
आत्महत्या केल्यावर कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती करीत फाय्याज यानी आत्महत्या केली होती.