धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागासह राज्यातील काही नगर परिषदेतील जागांची निवडणुक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली असुन याबाबत राज्य निवडणुक आयोगाने आदेश दिले आहेत.
नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल अपीलामध्ये सुनावणी झालेली आहे. परंतु, न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत तसेच सुनावणी पुढील दिनांकास होणार आहे अशा जागांसाठी चिन्ह वाटप करण्यात यावे किंवा कसे अशा प्रकरणात ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील ज्या जागांसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल असून सुनावणी प्रलंबित आहे किंवा सुनावणी झालेली आहे, परंतु आदेश अप्राप्त आहेत फक्त अशा जागांसाठी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करता येणार नाही. तसेच फक्त अशा जागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोगाद्वारे 27 नोव्हेंबर रोजी आयोजित व्हीसीमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यातही अशी उक्त परिस्थिती निर्माण झाली असल्यास फक्त अशा जागांसाठी चिन्ह वाटप करता येणार नाही तसेच फक्त अशा जागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. याबाबतीत इतर काही अडचणी असतील तर राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावे असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना कळविले आहे.
धाराशिव नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 2, 7 व 14 मधील निवडणुक पुढील आदेशापर्यंत स्थगित झाली आहे. या प्रभागातील उमेदवारी अर्जाबाबत प्रकरणे कोर्टात गेली होती.











