धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगरपरिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षणाला 27 ऑक्टोबर पासुन सुरुवात होणार असुन तसे लेखी आदेश स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक दीपाराणी देवतराज यांनी काढले आहेत. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक यांना विशेष लेखा परीक्षणाचे आदेश दिले आहेत. 7 अधिकारी यांचे पथक विशेष लेखा परीक्षण करणार असुन त्यात नांदेड, सोलापूर, जालना जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे.
एकीकडे 140 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रकरणात कार्यारंभ आदेश काढावे यासाठी मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यावर विविध राजकीय दबाव येत असताना दुसरीकडे धाराशिव नगर परिषदेच्या विशेष लेखापरीक्षणाचे आदेश येऊन ठेपले आहेत, तत्कालीन 2 मुख्याधिकारी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार हे करण्यात येणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप धस यांनी केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील परीक्षण होणार आहे. यलगट्टे यांच्यावर गुन्हे नोंद होऊन त्यांना काही महिने जेलमध्ये राहवे लागले त्यानंतर त्यांचे निलंबन झाले तर फड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली.
विशेष लेखापरीक्षणासाठी ज्ञानेश्वर सुळ, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव हे पथक प्रमुख राहतील. डी आर शिनगारे, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, बा भा भारती, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, बी एस मलाव, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, सुदाम वाघमारे, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, आकाश वर्मा, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना व सुशिल कुलकर्णी, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना अश्या 7 जणांचा समावेश आहे.
विशेष लेखापरीक्षणाचे कामकाज पुर्ण करुन व नमुद कालावधीचा विशेष लेखापरीक्षण अहवाल सहायक संचालक, धाराशिव यांनी पुनर्विलोकन करुन अंतिमीकरण करण्यासाठी सहसंचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, छत्रपती संभाजीनगर यांना विशेष लेखापरीक्षण पुर्ण होताच विनाविलंब सादर करावा असे आदेशात नमुद आहे.