भूमी अभिलेख विभागाकडून 3 व 4 जानेवारी राबविण्यात येणार विशेष मोहीम
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यात अभिलेख विभागाच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 3 व 4 जानेवारी 2026 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पावसाळ्यात काम न होऊ शकल्याने 710 मोजणी प्रकरणे प्रलंबित होती, ज्यापैकी 510 मुदतबाह्य प्रकरणे आहेत. यापैकी 117 प्रकरणे दोन दिवसात निपटवली जाणार आहे. ज्यासाठी 55 सर्वेअर सहभागी होतील. जिल्हा अधीक्षक संग्राम जोगदंड यांनी सर्व संबंधितांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये माहे जून ते ऑक्टोबर 2025 या महिन्यांत सतत पाऊस असल्या कारणाने मोजणी काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव कार्यालयाकडे पावसाच्या व्यत्ययामुळे व शेतजमीनीत चिखल असल्यामुळे मोजणी काम करता आले नाही. या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रलंबित मोजणी प्रकरणाचा निपटारा करण्याकामी विशेष मोहीम 3 व 4 जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निपटारा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी इतर तालुक्यातील 55 सर्वेअर यांना बोलावून मोहीम यशस्वी केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत 117 प्रकरणे 3 व 4 जानेवारी या दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांनी या दिवशी उपस्थित राहुन आपल्या जमिनींची मोजणी करून घ्यावी, धाराशिव जिल्हयातील शेतक-यांना या मोहीमेबदल माहिती होणे आवश्यक आहे. जमीन धारकांना नोटीस पोस्टाव्दारे पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच ई चावडीवरही प्रसिध्द केलेल्या आहेत. तरी या मोहीमेची जनतेस माहिती व्हावी आण व्यापक प्रसिध्दी होणे आवश्क आहे.












