धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या विविध 27 कोटींच्या घोटाळ्यांचा तपास विशेष तपास पथक अर्थात एसआयटी मार्फत केला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात केली. नगर परिषदेत झालेल्या घोटाळ्यात बाबत भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला होता. धस यांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री यांनी एसआयटी नेमण्याची घोषणा करीत घोटाळ्यात काही बाबीत तथ्यता असल्याचे मान्य केले.
धाराशिव नगर परिषदेतील घोटाळ्याबाबत आमदार धस यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले होते त्याला दीशाभूल व चूकीची उत्तर देण्यात आल्याचा आरोप करीत आमदार धस यांनी आक्षेप घेतला. कामाच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याची तक्रार दिली होती त्यावेळी नाव न टाकता तक्रार दिली होती. याबाबत तारांकीत प्रश्न विचारल्यावर 4 महिन्यांनी गुन्हा नोंद करण्यात आला.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे व इतर आरोपी हे गेली काही महिने जेलमध्ये आहेत त्यानंतर विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी कामात सुधारणा करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी तीच वाटचाल कायम ठेवली असा आरोप धस यांनी विधिमंडळात केला. 542 प्रमाणके पैकी 242 प्रमाणके गहाळ आहेत तर तब्बल 138 बँक खाती वेगवेगळ्या नावाने काढली गेली आहेत.अनेक ठिकाणी रस्त्याचे काम झालेले नाही तरी बिल काढले आहे. घरकुल, अण्णाभाऊ साठे, रमाई योजनेचे पैसे नगर परिषद फंडात वर्ग केले गेले आहेत.
नवीन विद्यमान मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांनी एकमेकांना वाचवण्याचे प्रयत्न केले आहेत त्यामुळे या दोघांना कलम 120(ब ) प्रमाणे आरोपी केले जाईल का? तसेच तज्ज्ञ लोकांची समिती करुन एसआयटी मार्फत तपास केला जाईल का असा प्रश्न आमदार धस यांनी विचारला तसेच यात काही पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना या घोटाळ्यात मोजमाप पुस्तिका गहाळ करणे, निधी वर्ग करणे यासह अन्य बाबीत वस्तुस्तिथी असल्याचे मान्य करीत एसआयटी नेमण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिल्याने 27 कोटी रुपयांची कामे खरीच झाली का नाहीत ? यासह अनेक तांत्रिक व प्रशासकीय बाबी तपासल्या जाणार असुन काही ठेकेदार रडारवर येणार आहेत तर या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढू शकते.