वाशी – शोएब काझी, समय सारथी
तालुक्यातील इंदापूर येथील नरसिंह भैरवनाथ शुगर वर्क्स साखर कारखान्यावर आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती संकल्प विजयी मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा वाशी–भूम–परंडा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात शिंदे गट शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “आज सर्व विरोधी शक्ती माझ्या विरोधात एकवटल्या असून त्यांना या मतदारसंघातील झालेला विकास नको आहे,” असे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षांत तसेच मागील तीस वर्षांच्या तुलनेत आपण जिल्ह्यात आणलेल्या विकासनिधीचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
अतिवृष्टी व पूरस्थितीच्या काळात जनतेला मदतीला कोणीच पुढे आले नाही, मात्र आपण स्वखर्चातून रस्ते दुरुस्ती करून पूरग्रस्तांना मदत केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नरसिंह भैरवनाथ शुगर वर्क्स हा साखर कारखाना मोठ्या कष्टाने सुरू केल्याने शेतकरी व स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मागील निवडणुकांतील निसटत्या विजयाबाबत खंत व्यक्त करत, काही गद्दारांमुळे आपला विजय काठावर राहिल्याचे स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकजुटीने काम करावे, जो उमेदवार दिला जाईल त्याचे निष्ठेने काम करावे आणि वाशी–भूम–परंडा मतदारसंघातील 26 पंचायत समिती व 13 जिल्हा परिषद जागा जिंकून आपल्या भागात भगवा फडकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.












