धाराशिव – समय सारथी
एक वर्षांपासून मंजूर रस्ते फक्त राणाजगजीतसिंह पाटील यांनी अडवणूक केल्यामुळे रखडले. आता जनरेट्यामुळे ही कामे होणार आहेत. त्यात राणाजगजीतसिंह पाटील यांचे 22 कोटी रुपये बुडाल्याने त्यांची पोटदुखी सुरु असल्याचे उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव म्हणाले. महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे, सरफराज काझी, राष्ट्रवादीचे बाबा मुजावर, युवासेनेचे रवी वाघमारे, राणा बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी गुरव म्हणाले की,140 कोटीतुन शहरातील मंजूर 59 डीपी रस्ते अंदाजपत्रकीय दराने होण्याचा अडसर दूर झाला आहे. मग अश्यावेळी महाविकास आघाडीला श्रेय जाणार यामुळे राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे समर्थक आता नुसत्या वावड्या उठविण्याची धडपड करत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मंडळींनी रस्त्याच्या मुद्द्यावरून खासदार व आमदार यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला होता. पण वास्तव लपून राहत नाही व राणाजगजीतसिंह पाटील यांचा स्वभाव पाहता त्यांना कुणी चांगल केलेलं पाहवत नाही असा आहे. जनतेला वेठीस धरून यांनी शहर विकास थांबविणाऱ्या राणाजगजीतसिंह पाटलाचा खरा चेहरा उघड झाला आहे.
पालकमंत्री यांनी मंजूर केलेल्या जिल्हा नियोजन समितीचे अडीचशे कोटीच्या कामाला याच राणाजगजीतसिंह पाटलांनी स्थगिती आणली हे जगजाहीर आहे, याबाबत स्वतः पालकमंत्री यांनी पत्रकारांना मुलाखत देताना सांगितले त्यामुळे आता राणाजगजीतसिंह पाटील स्वतः चा चेहरा झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत असा टोला गुरव यांनी लगावला.
140 कोटीच्या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर सात दिवसात निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक होते, तर 90 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. पण एक वर्ष होऊनही निविदा उघडलीच नाही तेव्हा राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे समर्थक काय करत होते असा सवाल गुरव यांनी विचारला. त्यानंतर जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीने हा विषय लावून धरला. 6 जानेवारी रोजी जनतेसह रस्ता रोको केला व तेव्हा मुख्याधिकारी यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरवात करु असे लेखी आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित केले.
28 फेब्रुवारी नंतरही कामाच्या बाबतीत हालचाल दिसत नव्हती. पण त्या आंदोलनानंतर 25 जानेवारी रोजी निविदा दर उघडण्यात आले. तरीही कामे सुरु होत नाहीत हे पाहून 28 एप्रिल रोजी महाविकास आघाडीकडून आमरण उपोषण सुरु केले. तिसऱ्या दिवशी पालकमंत्री यांनी आंदोलनास भेट देऊन कामे करण्यात येतील असे आश्वासन दिले. पुढे दोन मे रोजीच ही कामे अंदाज पत्रकीय दराने करून घेण्याबाबत नगरपरिषद संचालनालय यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानुसार 23 मे रोजी प्रधान सचिव यांच्या बैठकित हा निर्णय झाला. त्यामुळे आता गुत्तेदार हे अंदाजपत्रकीय दरानेच काम करणार असल्यामुळे शहरवासियांचे 22 कोटी रुपये वाचले आहेत यामुळेच राणा पाटील यांची पोटदुखी सुरु असल्याचे गुरव म्हणाले.
राणा पाटील किंवा त्यांच्या समर्थक यांनी ही कामे सुरु होण्यासाठी कोणाकडे काय पाठपुरावा केला हे त्यांनी दाखवून द्यावे असे आव्हान गुरव यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात जर सर्व कामे अंदाजपत्रकीय दराने करण्याचा निर्णय घेतला होता असं भाजपची मंडळी सांगत आहेत. मग राज्याच्या ऊर्जा विभागाकडून होणारी कामे अंदाजपत्रकीय दरापेक्षा अधिक कसे? असा सवाल गुरव यांनी उपस्थित केला. सत्ताधारी मंडळींनी राजकारण न करता ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावा आम्ही तर ते करणारच आहोत. जनहिताच्या कामात राजकारण करु नये असे आवाहन सोमनाथ गुरव यांनी यावेळी केले.