धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट उद्या मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करणार आहे. धाराशिव येथील लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. जागा राष्ट्रवादीला दिल्यानंतर शिवसेना पदाधिकारी यांनी आक्रमक होत बैठक घेतली. राजीनामा सत्रानंतर शिंदे गट 3 हजार गाड्या घेऊन मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असुन त्यांना शिवसैनिक यांच्या भावना व भुमिका सांगणार आहे. जागा शिवसेनेला परत घेण्याची मागणी करणार असुन जागा न मिळाल्यास निर्णायक भुमिका घेणार आहे. कदाचित बंडाची मोठी ठिणगी पडू शकते त्यामुळे उद्याची भेट महत्वाची आहे.
आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपमधुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचा विरोध असुन राष्ट्रवादीचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पदाधिकारी यांच्या भावना तीव्र असल्या तरी मंत्री सावंत यांनी त्यांची भुमिका अद्याप उघड केली नाही.
वाशी येथील पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे देत शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी आहे. धनंजय सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी पदाधिकारी कार्यकर्ते याची मागणी व आक्रमक भुमिका घेतली आहे. भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जबाबदार असणार नाहीत अशी भावना तालुक्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर तानाजीराव सावंत हे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे व ते जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असे सांगितले.
आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुका लढलो आहोत त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे. आता काय आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काम करायचं का ? असा संतप्त सवाल उपस्थित करत धनंजय सावंत तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पक्ष म्हणून तितके वलंय राहिले नाही, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सांगितले तरी लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे अजुन वेळ गेली नाही असे सांगत जागा शिवसेनाच्या धनुष्यबाण याला सोडावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिंदे गट अलिप्त – बॅनरवर सावंत यांचा फोटो नाही
धाराशिव येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या व उमेदवारी जाहीर झाल्याच्या जल्लोषापासुन शिवसेना शिंदे गट अलिप्तच राहिला. अर्चना पाटील यांना भाजपच्या ज्या प्रमुख पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या त्यात पालकमंत्री डॉ सावंत यांचा फोटो सुद्धा वापरला गेला नाही याबद्दल कार्यकर्ते यांनी उघड संताप यावेळी व्यक्त केला.आमदार राजेंद्र राऊत, नितीन काळे यांनी अर्चना पाटील यांना पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्यात त्यात पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचा फोटो वापरण्यात आला नाही. सावंत यांना पोस्टर स्थान देण्यात आले नाही त्यामुळेही शिवसेना पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी मंत्री तानाजीराव सावंत यांनी पाठ फिरवली तर शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले हे हजर होते मात्र नंतर ते सक्रीय झाले नसुन वाट पाहत आहेत.
निवडणुक कार्यक्रम –
धाराशिव जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असुन 12 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल तर 19 एप्रिल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 20 एप्रिल रोजी अर्जाची छानणी तर 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 7 मे ला मतदान असुन मतमोजणी 4 जुन रोजी असणार आहे.