धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे बीड प्रमाणे आका संस्कृतीचा उदय होत असुन ड्रग्जनंतर अवैध बंदूका आल्या कुठून याची चौकशी करा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. लक्षवेधीतुन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अकलेचे दिवाळे निघाले असुन त्यांनी ड्रग्ज विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रसार माध्यमाना टार्गेट केले आहे. गोळीबार, हल्ला यातून वागण्यातुन आता तुळजापूरची बदनामी होत नाही का? असा घणाघात ओमराजे यांनी केला.
एखाद्याच्या घरावर कोयता, बंदूका घेऊन जाऊन गोळीबार करणे हे कितपत योग्य आहे. कुलदीप मगर हे गंभीर जखमी असुन त्यांचा जबाब मी वाचला त्यात म्हणटले आहे की तु विनोद पिटू गंगणे याच्या विरोधात का काम केले, तुला उचलून नेहून त्याच्या समोर तुला मारू अश्या पद्धतीची धमकी जर गुंड प्रवृत्तीची लोक देत असतील तर त्यांना नेमक यातून काय दर्शवायचं आहे. ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्याच पद्धतीने तुळजापूर येथे कुलदीप मगर यांची आका विनोद पिटू गंगणे समोर हत्या करायची होती का?
ज्या पद्धतीने गुन्हेगारी लोकांना पाठीशी घालून संरक्षण देत आहेत ते योग्य आहे का? आणि तुळजापूर शहरातील लोकांना हे मान्य आहे का? आज मगर यांच्या घरासमोर हा प्रकार झाला आहे उद्या प्रत्येकाच्या घरासमोर समोर झाला तर काय करायचे असा प्रश्न ओमराजे निंबाळकर यांनी केला. पोलिसांनी कठोर कारवाई नाही केली तर हा प्रसंग प्रत्येक सामान्य तुळजापूरकर यांच्या वाट्याला येणार आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील नाक मुरडून म्हणत होते की, तुळजापूरची बदनामी होत आहे, ड्रग्ज व दोन नंबरच्या पैशातून आलेली काळी संपत्तीच्या माध्यमातून आलेला हा उन्माद आहे. आका संस्कृती आपल्या जिल्ह्यात आणायची आहे का? अश्या वृत्तीची लोक आपल्याला जोपासायची आहेत का? हा प्रश्न जनतेला असुन शासनाने याची दखल घ्यावी. ज्या पद्धतीने घडत आहे, पोलिस पाठीशी घालत आहेत ते दुर्दैव असुन निषेधार्य आहे. या वृत्तीच्या आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे.
ड्रग्जच्या गुन्ह्यात जी लोक समाविष्ट होती त्याच लोकांकडे पिस्टेल बंदूक आले कुठून? गोळीबार झाला कसा? ही शस्त्र आली कुठून? त्यांना दिली कोणी? या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे व दोषीवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.
ड्रगजचे विष तुळजापूर येथे आणून विकले जात होते, ड्रग्जच्या अनुषंगाने हे रॅकेट उध्वस्त व्हायला हवे, त्यातील आरोपी निष्पन्न झाले व पकडले पाहिजेत. तरुण पिढीचे पुढचे आयुष्य बरबाद झाले नाही पाहिजे अश्या पद्धतीच्या लक्षवेधीची अपेक्षा होती मात्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची लक्षवेधी वाचली त्यात ड्रग्ज विरोधात जे लढत आहेत त्या प्रसार माध्यम याच नाव घेतलं. माध्यमानी काही खोट्या बातम्या केल्या होत्या का? गृहमंत्री फडणवीस यांच्या गृह विभागातील पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता का? गंगणे याला 2 महिने जेलमध्ये ठेवले होते हे खोटे होते का?
जो काही प्रकार घडला, ड्रग्जच व्यसन आणलं आणि त्यातून अवैध शस्त्र आणली गेली आणि त्याचा धाक दाखवून गोळीबार करण्याचा प्रकार घडत असेल तर याचा विचार आता करायला हवा. लक्षवेधीमधुन अकलेचे दिवाळे निघाले असल्याचे आमदार पाटील यांनी सिद्ध केले आहे. गोळीबार, हल्ला यातून वागण्यातुन तुळजापूरची बदनामी होत नाही का? याचा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी करणे गरजेचे आहे. अश्या लोकांना खड्यासारखे वेचून बाजुला काढणे लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी असली पाहिजे.











