11 हजार 500 कोटींचा निधी दिला, 80 टक्के काम पुर्ण – 15 हजार शेतकऱ्यांना घेऊन जाणार, पालकमंत्री डॉ सावंत
धाराशिव/ढोकी – समय सारथी, अंकुश माळी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर हक्काचे पाणी 2022 मध्येच आले असते मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही, पाण्याच्या मुद्यावर आजवरच्या प्रस्थापितांनी गाजर दाखवीत पाने पुसली व निवडणुका जिंकल्या आणि नंतर 5 वर्ष फिरकलेचे नाहीत. पाण्यासाठी 11 हजार 500 कोटींचा निधी दिला असुन त्यातून बोगद्याचे 80 टक्के काम पुर्ण झाले आहे, ते दाखवण्यासाठी 15 हजार शेतकऱ्यांना घेऊन जाणार असल्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी जाहीर केले.
महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजवरचा ज्वलंत प्रश्न हा हक्काचे 21 टीएमसी पाणी असुन आजवरच्या सर्व प्रस्थापित यांनी आमच्यावर अन्याय केला व गाजर दाखविले. पण हे पाणी कुठून येणार ? परवानगी, काम सुरु आहे का ? भाबडा शेतकरी पाणी मागतो मात्र गेले नाही, प्रत्येक नेत्याने पाणी प्रश्न मार्गी लावतो असे सांगत मते घ्यायची व 5 वर्ष फिरकायचे नाही, शेतकऱ्याच्या तोंडाला आजवर पाने पुसली असे म्हणत पालकमंत्री सावंत यांनी शेतकऱ्याच्या व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडल्या.
बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात 700 किमीचे नाला खोली व सरळीकरण काम केले त्यामुळे काही प्रमाणात दुष्काळ मुक्ती झाली. 2021 पासुन 7 टीएमसी पाण्यावर मी काम करतोय. कृष्णा भीमा, कृष्णा नीरा स्थिरीकरणच्या माध्यमातून पाणी उजनी ते जेऊर मिरगव्हाण, कौडगाव नंतर परंडा, वाशी उमरगा, लोहारा व तुळजापूर येथे पाणी जाणार आहे.
सत्तातर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्ये 11 हजार 500 कोटीचे बजेट पाणी आणन्यासाठी मंजुर केले, त्यातून बोगद्याचे 80 टक्के काम झाले असुन फेब्रुवारी अखेर धाराशिव जिल्ह्यातील 10 ते 15 हजार लोकांना तिथे घेऊन जाणार असुन मुख्यमंत्री यांनी काय काम केले आहे ते हा सूर्य हा जयद्रथ असे दाखवणार आहे असे मंत्री सावंत म्हणाले. शिंदे 2019 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असते तर 2022 मध्ये पाणी आले असते, हे दुर्दैव आहे त्यावर आम्ही आश्रू ढाळणार नाही, देर है अंधेर नही है. गतिमान सरकारचे हे काम आहे.
मुख्यमंत्री 18 ते 20 तास काम करतात, पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरतात ते लोकांना वर्षावर नेहमी उपलब्ध असतात, त्याची दारे कायम उघडी असतात. भारताच्या इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही. इतकी ऊर्जा परमेश्वर कृपेशिवाय शक्य नाही असे मंत्री सावंत म्हणाले.