खासदार आमदार यांना काळु बाळु उपमा – ठेकेदारीसह भंगार विकले, सहकार मोडीस काढला
धाराशिव/ढोकी –
बस एक दम काफी है.. लातुरच्या नेत्याला मुख्यमंत्री शिंदेचा एक डोस अन तेरणा मिळाला असे सांगत मंत्री सावंत यांनी तेरणा कसा मिळाला याचा गौप्यस्फ़ोट केला. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर शिवसंकल्प मेळाव्यात काळु बाळूची उपमा देत जोरदार टीका केली. ठेकेदारीसह भंगार विकले, सहकार मोडीस काढला अशी टीकाही केली. लातूर येथील देशमुख परिवाराने ट्वेंटी वन शुगर समुहाच्या माध्यमातून तेरणा भाडेतत्वावर घेण्याचे टेंडर भरले होते मात्र ते सावंत यांना मिळाल्यावर कोर्ट कचेरी व इतर ठिकाणी प्रकरणे दाखल केली होती.
पुर्वीचे सगळ्या प्रस्थापित यांनी या ठिकाणचा सहकार मोडीस काढला. दूध संघ, तेरणा साखर कारखाना बंद पाडला, भैरवनाथने साखर कारखाना सुरु झाल्यावर सगळ्यात जास्त भाव दिला. तेरणा धाराशिव जिल्ह्याची अस्मिता असताना तो मोडून काढला, भंगार सुद्धा विकले काही ठेवले नाही. जिल्हा बँकेची वाट लावली.अनेक ठेवीदार मरण पावले मात्र त्यांना काही मिळाले नाही. एफडीचे हक्काचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री यांनी बँकेसाठी काहीतरी करावे असे मंत्री सावंत म्हणाले.
तेरणा कारखाना सुरु होण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शक्ती होती, शिंदे यांच्यामुळे तेरणा कारखाना सुरु झाला,मी त्यांना शेतकऱ्यांच्या भेटल्यावर व्यथा सांगितल्या त्यावेळी मी मंत्री नव्हतो आमदार होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर पहिल्या अधिवेशनात लातूरच्या नेत्याला बोलवून सांगितले, तुमच्यात बोटं कोण घालतंय त्याचं मला काही देने घेणे नाही.मी शेतकऱ्यांच्या बाजूचा असुन तानाजीराव यांना साखर कारखानदारीमध्ये अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या रस्त्यात पाय टाकायचा नाही, अशी कळकळीची विनंती केली.
बस्स एकही दम काफी है. मुख्यमंत्री यांच्या एका दमाने 3 दिवसात कोर्टातल्या सगळ्या केस लातूरच्या नेत्याने काढून घेतल्या.तेरणाच्या चिमणीतून जो धुर बाहेर पडत आहे तो फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या कृपेनें शक्य झाले. जोपर्यंत जीवात जीव असले तोपर्यंत आयुष्यभर शिंदे यांची साथ सोडणार नाही, अशी शपथ सावंत यांनी घेतली व तेरणा नेहमी 50-100 जास्त भाव मानाचा तुरा म्हणून देणार असे जाहीर केले.
पुर्वीचे या ठिकाणचे काळू बाळू ज्यांनी आपल्यावर भरपूर शिंतोडे उडविले, तुमच्या माध्यमातून माझ्या आशिर्वादामुळे आडगाळीत पडलेल्या लोकांना राजकारणात पुन्हा जिवंत केले, त्यांना खासदार केले. ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नसताना त्यांना आमदार केल. हया कारखान्यातील भंगार सुद्धा विकले, शेतकरी यांचा विचार केला नाही. जे काही असेल ते हम और हमारे कुटुंब. कोणतेही कामे, कॉन्ट्रॅक्ट सगळे घरी, शिवसैनिक देशोधडीला लावले, त्यासाठी काही केले नाही असे म्हणत मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका केली.
दरोडा टाकणाऱ्या चोरांच्या टोळीने शहराचा केला उकिरडा
धाराशिव शहराची अवस्था मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घातली होती, या ठिकाणी पहिली दरोडा टाकणारी चोरांची टोळी होती. शिंदे नगर विकास मंत्री असताना त्यांनी कामे करुन घेतली. पाया पडुन रडून आपटून 200-300 कोटी रुपये घेतले व चोऱ्या केल्या त्यामुळे धाराशिव शहराचा उकीरडा झाला आहे. पिण्याचे पाणी 8 दिवसातून एकदा येते, रस्ते उखडून गेले आहेत, कचरा साचला आहे. समस्या सोडवण्यासाठी निधी द्या अशी मागणी केली.