धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या नेते व पदाधिकारी यांची बैठक मुंबईत संपन्न झाली. ‘आमचं सगळं ठरलं’ असुन शिवसेनेने भाजप सोबत युती करावी असे पक्षश्रेष्टीचे आदेश आहेत. जागा वाटपाचे काय ते योग्य वेळी कळवू, तुम्ही कामाला लागा असा आदेश शिवसैनिकांना बैठकीत देण्यात आला. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुलेसह सेनेचे जिल्हा प्रमुख व पदाधिकारी उपस्थितीत होते.
दरम्यान आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे सोमवारी धाराशिव जिल्ह्यात येणार असुन त्यांनी बैठका आयोजित केल्या आहेत त्यामुळे त्यांची भुमिका महत्वाची व निर्णायक ठरणार आहे. युती करावी यासाठी सावंत यांच्यावर दबाव टाकला जात असल्याने भुमीकेकडे लक्ष लागले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन पक्षश्रेष्टी तर दुसरीकडे पुतणे धनंजय सावंत यांच्या रूपाने ‘घरफोडी’ करून भाजप प्रवेशाची अशी दुहेरी व्युहरचना आखण्यात आली आहे. सावंतांची सर्व मार्गाने राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सावंत यांच्या काही शिलेदार यांना फोडण्यासाठी थेट संपर्क अभियान सुरु आहे.
जागा वाटपात कमी जागा दिल्या तर आम्ही युती करणार नाही अशी ठोस भुमिका काही जणांनी मांडली मात्र काही बोलू नका, मांडू नका. सगळं ठरलं आहे, फक्त आदेशाचे पालन करा असे सांगितले. भुम परंडा, वाशी सह धाराशिव, कळंब व तुळजापूर अश्या 6 तालुक्यातील काही पदाधिकारी व शिवसैनिक हे आमदार सावंत यांच्या पाठीशी असुन ते जी भुमिका घेतील त्यामागे उभे राहणार आहेत. उमरगा व लोहारा तालुक्यात काय होणार हे पाहावे लागेल. उमरगा नप मध्ये शिवसेना शिंदे व काँग्रेस सोबत होते.
कळंब तालुक्यात केवळ 2 जागा देण्याचा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव असल्याची माहिती आहे. धाराशिव तालुक्यात सुद्धा काही जागा देऊ अशीच भुमिका असुन काही मोजके पदाधिकारी सोबत घेऊन बोलणी अंतीम केली आहे. शिवसेनेचे काही स्थानिक नेते हे भाजपशी संपर्कात असुन ते वयक्तिक स्वार्थापोटी तडजोडी करीत असल्याचा शिवसैनिक यांचा आरोप आहे.












