धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत 10 जानेवारी रोजी धाराशिव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, बूथप्रमुख, गणप्रमुख व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बुधवारी जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक धाराशिव शहरातील शिवानंद फंक्शन हॉल येेथे घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मेळावा यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीस शिवसेनेचे सचिव तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, शिवसेना नेते तथा मराठवाडा विभागप्रमुख आनंद जाधव, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत, माजी खासदार तथा लोकसभा संपर्कप्रमुख प्रा.रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके, मोहन पनुरे, अमर परमेश्वर, युवा सेनेचे विभागप्रमुख नितीन लांडगे, अविनाश खापे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, संजय मुंदडा, बाळासाहेब मांगले, अर्चनाताई दराडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. येत्या 10 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे धाराशिव जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, बूथप्रमुख, गणप्रमुख व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात आपण धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी मागणी करणार आहोत. त्यादृष्टीने प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सूचित केले.
युवा सेनेचे नितीन लांडगे म्हणाले की, पालकमंत्री सावंत साहेबांनी आशीर्वाद दिला आणि धाराशिव लोकसभेत आमदारकीला पडलेला उमेदवार खासदार झाला. यावेळेस शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जो देतील तो उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा संपर्कप्रमुख प्रा.रवींद्र गायकवाड यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही राहणार असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अथवा महायुती जो उमेदवार देईल त्यांस निवडून आणायचे असल्याचे ते म्हणाले. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले असून यापुढेही शिवसेनेचाच खासदार राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची असून ती पदाधिकार्यांसह शिवसैनिकांनी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन केले. पक्षाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मेळावा असून तो सर्वांनी मिळून यशस्वी करुया, असेही ते म्हणाले.
शिवसेना नेते आनंद जाधव म्हणाले, येत्या 6 जानेवारीपासून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. जेथे शिवसेनेचा खासदार आहे तेथे ते मेळावे, बैठका घेऊन पक्षाचा आढावा घेणार आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यावर शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिलेले असून स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मतदार येथे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत उमेदवार कोणीही असला तरी धाराशिवचा खासदार हा धनुष्यबाण आहे हे समजून सर्वांनी कामाला लागावे. पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे जाहीर करतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना सचिव तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी, एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नव्हेतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्हा दौर्यावर प्रथमच येत असल्याचे सांगितले. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय, विकासाच्या प्रभावी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पोहचवाव्यात, असे आवाहन केले. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला शंभर टक्के यश मिळणार आहेच, परंतु ते घवघवीत यश असायला हवे यासाठी सर्वांची जबाबदारी वाढली असल्याचेही ते म्हणाले.
बैठकीत तुळजापूर, परंडा तालुक्यातील इतर पक्षामधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षात जाहीर प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांनी केले. आभार जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी मानले. मेळाव्यास संपर्कप्रमुख अमर परमेश्वर, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, कळंबचे सागर मुंडे, गौतम लटके, सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष कांदे आदींसह जिल्हाभरातील शिवसेना, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, बूथप्रमुख, गणप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.