धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजप सोबतच्या महायुतीवरून शिवसेनेत सध्या मोठे घमासान सुरु आहे. स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता काही तालुक्यात भाजप सोबत परस्पर युती केल्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले असुन त्यांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यासह इतर नेत्यांना जाब विचारला. आमचं सगळं ठरलं असुन धाराशिव, तुळजापूर व कळंब या 3 तालुक्यात शिवसेनेला 29 पैकी 3 जागा मिळतील असा प्रस्ताव नेत्यांनी मांडला त्यावरून वातावरण चांगलेच पेटले आहे.
दरम्यान या सगळ्या गोंधळाच्या स्तिथीनंतर आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना फोन करून शिवसैनिकांच्या भावना सांगितल्या मात्र ठोस निर्णय किंवा निरोप आलेला नाही. शिवसैनिक शिंदे यांच्या निरोपाची वाट पाहत आहेत. शिवसेनेचे या तालुक्यात प्राबल्य आहे मात्र नेत्यांची युती असल्याने पदाधिकारी, शिवसैनिक हतबल झाले आहेत.
आमदार सावंत यांच्या मतदार संघातील पक्षाचे एबी फॉर्म त्यांना देण्यात आले असुन त्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत तर उमरगा लोहारा येथील फॉर्म माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांना देण्यात आले आहेत. तुळजापूर, धाराशिव व कळंब या 3 तालुक्याचे अधिकार संपर्कप्रमुख साळवी यांना देण्यात आले आहेत अशी माहिती आहे. साळवी यांना शिवसैनिकांनी जाब विचारल्यावर त्यांनी अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. मी तर ‘पोस्टमन’ अशी भुमिका घेत पालकमंत्री व वरिष्ठ नेत्याकडे बोट दाखवले.
आमच्या परस्पर केलेली युती, जागा वाटप चर्चा आम्हाला मान्य नाही असे म्हणत शिवसैनिक व पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री, खासदार श्रीकांत शिंदे यांना एसएमएस करण्याची मोहीम सुरु केली आहे. आगामी काळात शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेचा सामना पक्षश्रेष्टीना करावा लागु शकतो. 21 जानेवारी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसैनिक यांनी या 3 तालुक्यात अर्ज भरण्याची तयारी केली असुन या 3 तालुक्यात वेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळू शकते. सावंत हे शिवसैनिक यांना पाठबळ देत असुन त्यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
धाराशिव नगर परिषदेत हे घडले तेच जिल्हा परिषद निवडणुकीत होत असुन मुंबईतील आयात नेत्यांनी शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधला आहे असा आरोप केला. संपर्कप्रमुख साळवी हे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना एकटे भेटतात तर मुंबईत सगळे निर्णय ठरतात, हे आम्हाला मान्य नसुन पक्ष संपवण्याचा घाट घातला आहे. पक्ष भाजपला बीओटीवर दिला आहे. आगामी काळात शिवसेनेत अंतर्गत बंड होऊ शकते.












