धाराशिव – समय सारथी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही कारण धाराशिव जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्याने लाभार्थी यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे, अनेक CSC केंद्रावर अर्ज भरण्यासाठी 300 ते 400 रुपये घेतले जायचे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांनी या योजनेचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती व नगर परिषद कार्यालयात अचानक भेटी दिल्या. यावेळी काही महिलांनी त्यांचे ऑफलाईन अर्ज सादर केले ते स्वीकारले गेले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज अंगणवाडी सेविका महिला, आशा कार्यकर्तेसह प्रशासन जमा करुन घेणार आहे, या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत केली आहे. महिनाभरात धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थी यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी यांनी केला असुन युद्धपातळीवर कामाला लागण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामीण भागासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर शहरी भागासाठी नगर पंचायत किंवा नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत लागणारी कागदपत्रे द्यायची आहेत. उत्पन्न व इतर कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी गाव पातळीवर शिबीर घेण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. काही अडचणी असल्यास उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी व महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी घोषित करण्यात आलीय. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महिलेचा अर्ज व फोटो,आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत,रेशनकार्ड व सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे