धाराशिव – समय सारथी
गेल्या 15 महिन्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 5 हजार कोटीहुन अधिक निधी आणल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. काय झाडी, काय डोंगर फेम शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापु पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, महंत व काही ज्येष्ठ पत्रकार यांच्या हस्ते आमदार राणा यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार जेसीबीतुन फुलांची उधळण व ढोल ताश्याच्या गजरात आतिषबाजी करीत करण्यात आला. आमदार पाटील यांना मानपत्र देत मान्यवरांनी स्तुतीसुमने उधळत आशीर्वाद दिले.
न भूतो न भविष्यती अश्या या कौतुक सोहळ्याला भाजप कार्यकर्ते, नागरिकांची उपस्थितीती होती. 5 हजार कोटींच्या निधीने विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकच वादा राणा दादाच्या घोषणानी सभागृह दणाणले.
पाटील परिवाराला मंत्रीपद हे काही नवीन नाही, मंत्रीपद वापरून वापरून यांच्या घराच्या पायऱ्या गुळगुळीत झाल्या आहेत तरीसुद्धा मंत्रीपद मागता, वचन देतो आम्ही शिफारस करू असा मिश्किल टोला लागवला. आमची मंत्रीपद सुरुवात सुद्धा नाही, तुम्हाला मंत्रीपद मिळावे मात्र आम्हाला पण मंत्री पद मिळू द्या. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत भेटून आमदार राणा यांना मंत्रीपद द्यावे अशी जनतेची मागणी आहे असे सांगत तुमच्यासाठी मंत्रीपद मागतो असे आश्वासन शहाजी पाटील यांनी दिले.
नागरी सत्काराला मला इतका प्रतिसाद मिळेल हे अपेक्षित नव्हते, या सत्काराने मला हत्तीचे बळ मिळाले. डॉ पाटील यांनी केलेल्या कामाची माहिती आजच्या युवा पिढीला नाही, ती करुन देणे गरजेचे आहे. पाठबंधारे मंत्री असताना त्यांनी जे काम केले त्याच्यामुळे साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने सुरु झाले. आर्थिक सुबत्ता आली, शेतकरी शेती करू शकला, हे वास्तव सर्वापर्यंत पोहोचवा असे आवाहन आमदार राणा यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
आपला जिल्हा मागास नाही, जे तसे बोलतात ते लबाड आहेत, डॉ पाटील यांनी एका टप्यावर विकास आणून ठेवला आहे. शास्वत पाणी, मानसिकता या 3 बाबीत बदल हवा. पाठीत खंजीर खुपसून तत्कालीन ठाकरे सरकारने टेक्स्टईल पार्क व इतर निधी अडवला. विरोधक यांना मी बेकिंमत करीत नाही त्यांच्यावर टीका करत नाही मात्र त्यांनी विकासासाठी काय केले हे लोकांनी विचारावे. राणा यांनी विकासाचा पाढा वाचत विकासाच्या अनेक संकल्पना मांडल्या.
मला राजकारणात यायचे नव्हते मात्र काही बाबीमुळे मी आलो त्याच्या काही सकारात्मक व नकारात्मक बाबी आहेत. मी जनतेच्या ऋणात आहेतअसे सांगत आमदार पाटील भावनिक झाले. शेतकरी आत्महत्या नंतर त्यांचे स्तिथी व दुःख लक्षात येते. मी असा सोहळा कधी पाहिला नाही असे सांगत त्यांनी शहाजी बापु यांनी नियोजित शस्त्रक्रिया सोडून उपस्थितीत राहिले त्यामुळे सर्वांचे आभार मानले.
सर्वांच्या हक्काचा,सर्वांच्या काळजातला आपला माणूस.. उच्च विद्याविभुषित,चारित्र्य संपन्न, सुस्वभावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे संवेदनशील लोकनेते आमदार राणाजगजीतसिंह पाटील.. कर्तव्यदक्ष आमदार, कामगिरी दमदार, सेवक धाराशिवचा बळीराजाचा आपल्या मातीच्या माणसांचा तसेच पीक विमा स्पेशालिस्ट आमदार अश्या स्वरूपाची बॅनरबाजी शहरात व कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. युथ फोरम व धाराशिव नागरी सत्कार संयोजन समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
डॉ पद्मसिंह पाटील यांनी 40 वर्ष राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवला, राजकीय मूठ बांधली, त्यांनी जी माणसे घडवली त्यात मी आहे. डॉ पाटील यांनी सर्व सामान्य लोकांसाठी खुप दुःख सोसले, मराठवाड्यातील 5 रत्न पैकी डॉ पाटील एक असुन त्यांचा समाजसेवेचा वारसा आमदार राणा चालवीत आहेत असे आमदार शहाजी पाटील यांनी सांगत जुन्या आठवणीना उजाळा दिला.
अनेकांनी विकास निधीचे आकडे सांगितले, तेरणामध्ये शाळा अनेक कोर्स आहेत पण तुमची माणसे गणितात कच्ची आहेत असे सांगत 5 हजार कोटी ऐवजी ही बेरीज सव्वा सात हजार कोटी पेक्षा जास्त आहे असे शहाजी बापु यांनी सांगितले. आमदार पाटील हे धाराशिवचा योग्य तो अपेक्षित विकास करतील असा विश्वास व्यक्त शहाजी बापु यांनी व्यक्त करीत काय झाडी डोंगर या फेमस डायलॉगने भाषनाचा शेवट केला.
10 हजार रोजगार निर्मितीचा टेक्निकल टेक्स्टईल पार्क, तुळजाभवानी चरणी सोलापूर धाराशिव रेल्वेगाडी,कृष्णचे पाणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कौडगाव एमआयडीसी, सौर ऊर्जा प्रकल्प, सुरत चेन्नई सहापदरी व शक्तीपीठ महामार्ग यामुळे चेहरामोहरा बदलला आहे. आमदार राणा यांनी 42 विविध कामात हजारो कोटींचा निधी आणल्याचा दावा केला.