धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरून आरोप प्रत्यारोप होत असताना कदम यांनी एक व्हिडिओ जारी करीत स्पष्टीकरण दिले आहे. मी राष्ट्रवादी पक्षात होतो, मी पक्ष सोडून भाजपात गेल्याने खिंडार पडले, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहले. माझ्यावर झालेले ड्रग्जचे आरोप हे राजकीय सुडबुद्धीचा एक भाग आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यांनी केलेला आरोप गंभीर असुन एक प्रकारे त्यांनी मनातील व्यथा मांडली आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप सुरुवातीपासुनच होत होता मात्र आता संशयित आरोपी असलेल्या खुद्द माजी नगराध्यक्ष यांनी हा राजकीय सुडबुद्धीचा एक भाग असल्याचा जाहीर आरोप केल्याने एक प्रकारे पुष्टी मिळाली आहे. ते राजकीय षडयंत्र रचणारा नेता कोण हेही जनतेसमोर येणे आता गरजेचे आहे. कदम यांनी यापुर्वी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विकासाच्या मुद्यावर जाहीर टीका केली होती, पाटील यांनी कागदावर नुसत्या पोकळ घोषणा केल्या, निधी आणला नाही. तो व्हिडिओ विधानसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे देखील पुर्वी राष्ट्रवादी अर्थात शरद पवार यांच्यासोबत होते मात्र बदलत्या राजकीय समीकरण व विकासाच्या मुद्यावर त्यांनी भाजप प्रवेश केला. अनेक वर्ष सत्ता दिली असताना काय केले ? विकासाच्या मुद्यावरून शरद पवार यांनी जाहीर सभेत पाटील परिवाराचे चांगलीच कानउघडणी केली होती.
माजी नगराध्यक्ष कदम म्हणाले की, मी पहिल्यांदा शरद पवार गटाचा अर्थात राष्ट्रवादी पक्षाचा 3 टर्म नगरसेवक त्यानंतर नगराध्यक्ष आहे. मी भाजप प्रवेश केल्याने तुळजापूर शहरात शरद पवार राष्ट्रवादी गटाला खिंडार पडले, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना वाईट वाटले व मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. पुजारी, तुळजापूर विकास करण्यासाठी मी भाजपात गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भरघोस निधी तुळजापूरला आणला असुन त्यातून तुळजापूरचा विकास होणार आहे. त्याला आकर्षित होऊन प्रवेश केला आहे. माझा प्रभाग 1 नंबर असुन तसाच शहराचा विकास व्हावा, सुंदर व्हावे या हेतूने भाजप प्रवेश केला आहे.
ड्रग्जमध्ये मी आरोपी आहे की नाही हे कोर्ट ठरवणार आहे, हे सुप्रिया सुळे यांना सांगू इच्छितो. आरोपी हे कोर्ट ठरवित असते. माझ्यावर झालेले आरोप हे राजकीय सुडबुद्धीचा एक भाग आहे. कोर्ट जो न्याय देईल तो मला मान्य असेल असे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम म्हणाले.
पोलिसांची कारवाई – परमेश्वर 36 क्रमांकाचे आरोपी, गंभीर आरोप
धाराशिव पोलिसांनी ड्रग्ज तपास करत 16 एप्रिल 25 रोजी 10 हजार 744 पानाचे दोषारोप पत्र दाखल करताना माजी नगराध्यक्ष कदम यांचा 36 क्रमांकचा आरोपी म्हणुन समावेश केला, त्यासाठी त्यांनी अनेक पुरावे, जबाब जोडले ते धक्कादायक आहेत. त्यात काही जबाब कोर्टात 164 अंतर्गत घेतले आहेत नंतर आरोपी केले.
22 जुन 25 रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर यांना अकलूज सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांना पुणे येथून 21 जुलै रोजी अटक होती त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना 10 ऑक्टोबर 25 रोजी सशर्त जामीन मंजुर केला, त्यात ‘धाराशिव तहसील प्रवेश बंदी’ चा समावेश आहे.








