धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील नियम व अटी मोडणाऱ्या कला केंद्राविरोधात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आळणी येथील साई कला केंद्र हे गेल्या काही वर्षापासुन अनधिकृतरित्या सुरु असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने हे कला केंद्र तात्काळ सील केले आहे. कला केंद्र मालकावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले असुन त्यासाठी तहसीलदार यांना प्राधिकृत केले आहे.
परवाना नसताना हे कला केंद्र सुरु होते असा अहवाल तहसीलदार यांनी दिला मूळ संचिकेचे अवलोकन केले असता आळणी येथे साई लावणी लोकनाट्य कला केंद्र चालविण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे आढळून आलेले नाही त्यामुळे हे कला केंद्र अनधिकृत असल्याचे जाहीर केले. अनधिकृत साई लोकनाट्य कला केंद्र बंद (सिल) करण्याबाबत तात्काळ संयुक्तपणे नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केले आहे.
साई सांस्कृतिक कला केंद्राचे अनुषंगाने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अटी व नियम मोडल्याने सांस्कृतिक कला केंद्रास देण्यात आलेला परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी पाठवला होता त्यावर जिल्हाधिकारी यांनी कला केंद्र सील करण्याचा व गुन्हे नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई, येडशी येथील पिंजरा कला केंद्र परवाना रद्द करून पिंजरा व साई कला केंद्र सील केले आहे तर नटरंग व चंद्राई कला केंद्र परवाना प्रस्तावात कागदपत्रे त्रुटी असल्याने अर्ज फेटाळला आहे. महाकाली कला केंद्राचा परवाना रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव, चोराखळी, येडशी हा भाग कला केंद्राच माहेरघर बनला असुन जुने नवीन असे जवळपास 12 ते 15 केंद्र येथे असणार आहेत. काही कला केंद्राच्या ठिकाणी हाणामारीचे गंभीर प्रकार घडले असुन तेथील काही नर्तिका खुन, आत्महत्यास प्रवृत्त करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी आहेत.
बंद खोलीत कला सादर केल्यास कायदेशीर कारवाई करू अश्या नोटीसा पोलिसांनी दिल्या आहेत, कला मंचावर कला सादर करावी, ग्राहकांना तिकीट द्यावे असा नियम आहे मात्र सर्रास स्वतंत्र बंद खोलीत हा प्रकार सुरु होतो, पारंपरिक पद्धती ऐवजी डीजे लावुन लावणीच्या नावाखाली ‘छमछम’ सुरु आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने कारवाई करू नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे.
नवीन कला केंद्राना परवाने द्यावे यासाठी सत्ताधारी पक्षातील एक नेता एक शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना भेटला मात्र त्यांनी फटकारत चांगलेच सुनावले. लावणी लोककलेच्या नावाखाली डीजे व ‘छमछम’ त्याला जोडधंदा म्हणून दारू विक्री, नर्तकीच्या ‘खास बैठका’ यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने काही धनवान व प्रतिष्ठित मंडळी या व्यवसायात पुर्ण क्षमतेने उतरले आहेत. काही जणांची छुपी गुंतवणूक यात आहे.