धाराशिव – समय सारथी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबारात आलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी व प्रशासनाचे यांना खडेबोल सुनावले. महसूल मंत्र्याने एक आवाहन केले तर इतकी लोक येऊ शकतात तर जिल्हाधिकारी व प्रशासन सामन्याच्या तक्रारी सोडवत का नाही असा प्रश्न मलाच पडला आहे असे सांगत कान टोचले.
राजकीय टेकू घेऊन जनता दरबाराचा ‘इव्हेंट’ करणे हे प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले, शाबासकी ऐवजी जिल्हाधिकारी व प्रशासन तोंडावर पडले, सगळ्यासमोर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. गर्दीच्या शक्तीप्रदर्शनाचे गणित बिघल्याने मंत्र्याचे खडेबोल ऐकावे लागले. फडणवीस सरकार गतिमान प्रशासनाचा दावा करीत होते मात्र धाराशिव जिल्ह्यात खुद्द मंत्र्यांनी त्याचा अनुभव घेतला, त्यांनी पोलखोल केली.
या पत्रकार परिषदेला आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे यासह जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलिस अधीक्षक शफकत आमना उपस्थितीत होत्या.
बावनकुळे यांच्या धाराशिव येथील जनता दरबाराला जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तब्बल 350 तक्रारी आल्याचे पाहुन मंत्री सुद्धा आवाक झाले, जिल्हाधिकारी यांनी काम केले असते तर ही वेळ आली नसती असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. लोकशाही दिवस बंद पडला आहे, अनेक उपक्रम राबविले जात नाहीत. सात बारा, शेत रस्ते, मोजणी यासारखे विषय छोट्या छोट्या बाबीवर निवेदन जर मंत्र्यांच्या दरबारात येत असतील तर ते योग्य नाही, असे ते म्हणाले.
महसूल मंत्र्याच्या एका आवाहनावर इतके लोक आले, हेच जर आवाहन जिल्हाधिकारी, तहसील यांनी करून गावात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवले असते, निरंतर प्रक्रिया राबवली असती तर इतके अर्ज माझ्याकडे आले नसते. पुढील वेळी इतके अर्ज न येण्यासाठी नियोजन व कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. आगामी 6 महिने आठवड्यातून 2 दिवस सायंकाळी 5 ते 7 या वेळेत अधिकारी यांनी गावात जायला पाहिजे, एक दिवस एक गाव हे अभियान वर्षभर राबवले तर सर्व समस्या संपून अभियान पूर्ण होईल जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी मनावर घेतले तर एकही अर्ज माझ्याकडे आला नसता असे म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी काय करावे, दौरे कसे करावे याबाबत कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिला.