कारवाईसाठी देवकते यांची न्यायालयात धाव – पोलिसांनी मागितली धर्मादाय कार्यालयाकडुन माहिती
धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी 2011 नंतर कोणतीही निवडणूक न घेता अथवा लेखा अहवाल सादर न केल्यामुळे सहधर्मादाय आयुक्तांनी रद्द केलेली आहे तरीही जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय दंडनाईक व सचिव दत्ता बंडगर हे सदरील प्रमाणपत्राचा गैरवापर करुन खेळाडूंसाडी निवड चाचणी स्पर्धा घेत आहेत यामुळे खेळाडूंचे नुकसान होत असल्यामुळे संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यासह कारवाईसाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती खेळाडू इंद्रजित देवकते यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत आपण कोर्टात ऍड विशाल साखरे यांच्या माध्यमातून प्रकरण दाखल केले असुन पोलिसात दिलेल्या तक्रारी नंतर त्यांनी धर्मादाय कार्यालयाकडे अहवाल मागवीला असल्याची माहिती देवकते यांनी दिली.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवकते म्हणाले की, 2008 साली उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नोंदणी झाली होती. त्यानंतर 2008 ते 2011 पर्यंत त्यांचा कालावधी होता. त्यानंतर 2011 ते 2018 पर्यंत संघटनेने निवडणूक घेतली नाही किंवा लेखा परीक्षण अहवालही सादर केला नाही. त्यामुळे 2018 साली सहधर्मादाय आयुक्तांनी संघटनेेचे प्रमाणपत्र रद्द केलेले आहे. तरीदेखील क्रिकेट असोसिएशन 19 वर्षाखालील, 14 वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड चाचणी घेत आहेत. सदरील निवड चाचण्या बार्शी तालुक्यातील क्रिकेट मैदानावर घेण्यात येत असल्याने बाहेरील जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग जास्त आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान होत आहे तसेच आर्थिक लुट, फसवणूक देखील होत आहे.
धाराशिव जिल्ह्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट मैदान मंजूर झाले होते परंतु जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील चुकीचे नियोजन आणि घोटाळ्यामुळे सदरील मैदानाचा निधी परत गेला. क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळाडूंचा सहभाग असणे गरजेचे असताना इतर व्यक्तींची संख्या यामध्ये अधिक होती. यामधील अनेकजण मयत झालेले असून अनेकांचा पत्ता एकाच ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे सदरील प्रकरणात आम्ही सहधर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी निवेदने दिली, परंतु कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे पालकांनी दक्ष राहावे, असे आवाहनही देवकते यांनी यावेळी केले.
दरम्यान बंडगर यांनी सर्व आरोप फेटाळले असुन नोंदणी रद्द बाबत अपील केले आहे ती बाब आता न्यायप्रविष्ट असल्याने बोलणे योग्य नाही, येत्या 2-3 महिन्यात चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.