धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या 140 कोटी रुपयांच्या कामावरून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकात चांगलीच जुपंली आहे. विसरला काय दणका ? असे म्हणत तुला ढोलकीला बांधीन, बदाबदा बडवीन असा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे तर बालिश, गद्दारी व संस्कारावरून खासदार ओमराजेंवर टीका करण्यात आली आहे. सोशल मीडियावर रिल्स व पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
लायकी नाही म्हणल्याला फारच राग आलेला दिसतोय.. 40 वर्ष मंत्री असताना काय केलं म्हणणारे खासदारसाहेब थोडे बालिश वाटतात. आ डॉ पद्मसिंहजी पाटील साहेब मंत्री असताना, जिल्ह्याचे मालक तुमचेच वडील होते खासदार महोदय डॉ साहेबांनी तुमच्या कुटुंबाला मान, प्रतिष्ठा आणि संधी दिली पण दुर्दैवाने त्या विश्वासाला गद्दारीने उत्तर देण्यात आलं. ज्या डॉ साहेबांनी तुम्हाला नाव दिलं, ओळख दिली, तेरणा कारखाना आणि डीसीसी बँकसारख्या संस्थांमध्ये स्थान दिलं, त्यांच्याच विरोधात उभं राहणं, हेच का तुमचे संस्कार..? खरे गद्दारी करणारे कोण? हे जनतेला उत्तम ठाऊक आहे असा आरोप पोस्टमध्ये केला आहे.
140 कोटी रुपयांच्या कामाची निविदा पुन्हा नव्याने काढावी अशी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची स्पष्ट भुमिका होती व ती आजही कायम आहे. सरनाईक यांनी 26 मे व 30 सप्टेंबर 2025 अश्या 2 वेळेस उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत लेखी तक्रार केली होती. कार्यारंभ आदेश देण्याच्या प्रकरणात मोठे ‘अर्थकारण’ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी करीत चौकशीची मागणी केली आहे. महायुतीतील पालकमंत्री यांनी तक्रार करीत ठोस भुमिका घेतली व आमदार राणा यांना घरचा आहेर दिला, यावर मात्र आमदार किंवा त्यांचे समर्थक काहीही बोलत नसुन खासदार आमदार यांच्यावर टीका करून विषयांतर करीत आहेत. मुद्याची लढाई आता विषयांतर होत गुद्यावर आली आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 140 रुपयांच्या कामाच्या कार्यारंभ आदेश देण्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी खासदार आमदार या विरोधकांची लायकी काढली. त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी उत्तर दिले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत त्यांना धोका दिला नाही. उलट त्यांनी शरद पवार यांना धोका दिला, त्यांनी लायकीची भाषा करू नये. त्यानंतर संस्कार, लायकीवरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.











