धाराशिव – समय सारथी
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार रवींद्र विश्वनाथ गायकवाड बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. रवींद्र गायकवाड यांनी 4 लोकसभा उमेदवारी अर्ज खरेदी केले असुन ते अपक्ष उमेदवारी भरणार असल्याची चर्चा आहे. महायुतीत जागा राष्ट्रवादीला सुटलेली असताना शिंदे गटाचे गायकवाड यांनी उमेदवार अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. रवींद्र गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली होती मात्र जागा राष्ट्रवादीला सुटली. भाजप मधुन राष्ट्रवादीत प्रवेश करुन अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे कालच रवींद्र गायकवाड हे अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी सुद्धा मागणी केली असुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत शक्तीप्रदर्शन केले होते. शिवसेनेच्या सावंत गटाची भुमिका गुलदस्त्यात असतानाच गायकवाड यांनी अर्ज घेतल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. मंत्री सावंत यांना आमदार पाटील यांनी उमेदवारी प्रक्रियेत एकटे पाडले आहे.
2009 लोकसभा निवडणुकीत डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील ( राष्ट्रवादी ) व रवींद्र गायकवाड अशी लढत राहिली. डॉ पाटील यांना 4,08,840 तर रवींद्र विश्वनाथ गायकवाड ( शिवसेना ) यांना 4,02,053 अशी मते पडली. पद्मसिंह पाटील 6, 787 मतांनी विजयी झाले.
2014 लोकसभा निवडणूकीत डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील ( राष्ट्रवादी ) यांना 3,73,374 तर रवींद्र विश्वनाथ गायकवाड ( शिवसेना ) यांना 6,07,699 मते पडली. रवींद्र गायकवाड 2,34,325 मतांनी विजयी झाले. 2019 ला मंत्री सावंत यांनी पुढाकार घेतल्याने रवींद्र गायकवाड विद्यमान खासदार असताना त्यांचे तिकीट कापून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली व ते विजयी झाले.