भुम – समय सारथी
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडुन उमेदवारी अर्ज भरल्यावर माजी आमदार राहुल मोटे यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीचे नेते कोणाला उमेदवारी द्यायची यावर निर्णय घेतील, जो निर्णय असेल तो मान्य असेल, मी महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे अशी प्रतिक्रिया मोटे यांनी दिली. निवडणुक लढण्याच्या भुमिकेवर ते ठाम असुन निर्णयाचा चेंडु त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दरबारात टाकला आहे. दरम्यान राज्यात महाविकास राज्यात कुठेही मैत्रीपुर्ण लढत करणार नाही अशी भुमिका काँग्रेस व इतर पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केली आहे त्यामुळे या मतदार संघात बंडखोरी होणार की शमणार हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मी परंडा मतदार संघासाठी एबी फॉर्म सोबत जोडून उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीच्या जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ मंडळी यांच्यात चर्चा सुरु आहे त्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे, शिवसेना पक्षाने काय केले आहे हे मला माहित नाही. आम्ही एकत्रीत बसून मार्ग काढु, महाविकास आघाडीचे सर्व निर्णय एकसंघ बसून घेऊ. रणजीत पाटील यांच्याशी माझे सकाळी बोलणे झाले आहे, महाविकास आघाडी यांच्यात कसलीही अडचण येणार नाही. जो निर्णय महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्टी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. महाविकास आघाडीचा धर्म पाळू, रणजित पाटील यांना उमेदवारी मिळाली तर मी काम करेल आणि मला उमेदवारी मिळाली तर ते काम करतील. पक्ष यातला मार्ग काढणार आहे.
परंडा या मतदार संघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी एकास एक लढत होणार अशी स्तिथी असतानाच राहुल मोटे यांनी आज उमेदवारी अर्ज खरेदी करीत दाखल केलं. सलग 3 टर्म आमदार असतानाही माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले नाही, त्यांना थेट एबी फॉर्म दिला. राष्ट्रवादी पुर्वी सेनेने उमेदवार जाहीर केला व खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला. परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांनी गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांना नाकारून रणजित पाटील यांना महाविकास आघाडीकडुन शिवसेने उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांना धक्का बसला. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते त्यांचे पुत्र रणजीत यांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी दिली आहे. मोटे यांच्या घरात 25 वर्ष आमदारकी राहिली मात्र त्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरुंग लावला व मोटे यांचा पराभव करुन विक्रमी विजय मिळवला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.