धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 70 वर्षीय आरोपी गोरोबा पांडुरंग वाघमारे यास विशेष न्यायालयाने आजन्म कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, हा निकाल विशेष न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी दिला. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख व सचिन सुर्यवंशी यांनी सरकारी पक्षाची बाजु मांडली.
पिडीतेची आई भांडे धुण्याच्या कामासाठी बाहेर गेली असताना, मतिमंद पिडीता घराबाहेर फिरत होती. एका महिलेनं पिडीतेच्या आईला सांगितले की, आरोपी वाघमारे याने पिडीतेला आपल्या घरी नेले असून घराला आतून कडी लावली आहे. फिर्यादी महिलेसह ग्रामस्थांनी आरोपीच्या घरासमोर गर्दी केली. दरवाजा ठोठावूनही आरोपीने तो उघडला नाही. मोठ्या आरडाओरडीनंतर गावातील एका व्यक्तीने दरवाजावर जोरात आवाज दिल्यावर आरोपीने दरवाजा उघडत “कुठे आहे तुझी लेक?” असा निर्ढावलेला सवाल केला.
फिर्यादीने घरात जाऊन पाहिल्यावर, पिडीता घाबरलेल्या अवस्थेत शेळ्या बांधायच्या खोलीत सापडली. घरी नेल्यानंतर विचारपूस केली असता, पिडीतेने सांगितले की, आरोपीने तिला मध खायला दिला, कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच, “मी रोज तुला मध देईन, पण कोणाला सांगू नको,” अशी धमकीही दिली होती.
पिडीतेच्या आईने बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाअंती दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावरून खटला विशेष न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अति शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी साक्षीदार तपासले तर जिल्हा सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी प्रभावी युक्तीवाद केला. उपलब्ध साक्षी व पुरावे लक्षात घेता, न्यायालयाने आरोपी गोरोबा पांडुरंग वाघमारे यास दोषी धरत आजन्म कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.