धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टीमुळे तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रामवाडी, भंडारवाडी, आरणी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी करून भाजप आमदार राणाजागजीतसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. नदीकाठच्या परिसरातील पिके पाण्याखाली गेली असून याचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे तेर येथे तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तेर येथील नदीकाठच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना दिल्या. विशेषतः पेठ परिसरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहून खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी केले.
भंडारवाडी शिवारात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतांमधील माती वाहून गेली असून, घरांमध्येही पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विश्वनाथ भीमा रसाळ यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना आधार दिला. या संकटाच्या काळात आपण त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, याची खात्री दिली.
शेतातील पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करण्याचे निर्देश आपण प्रशासनाला दिलेले आहेत. शासनाकडून जमीन व्यवस्थित करण्यासाठी मदत मिळते मात्र त्यासाठी शेतकरी बांधवांनी सजग राहून योग्य पंचनामे करून घेणे गरजेचे आहे. आरणी येथे अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा राहणार आहे. यासाठी योग्य पंचनामे होत आहेत कि नाहीत याकडे सर्वांनी लक्ष द्यावे से आवाहन केले.
येडशी-लातूर रस्त्यावरील दुधगाव परिसरात तेरणा नदी काठच्या शेतातील माती वाहून गेली असून पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले, याचबरोबर दुधगाव-खामगाव रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी आमदार पाटील यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. स्थानिक नागरिक आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या वेदना आणि चिंता जाणून घेतल्या.
यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, सतीश दंडनाईक, दत्ता देवळकर, पद्माकर फंड, श्रीमंत फंड, भास्कर माळी, गणेश फंड, तलाठी प्रशांत देशमुख, संजय काका लोखंडे, अप्पासाहेब गुळवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.