धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठवला आहे, त्यानुसार 11 गावे बाधित झाली आहेत. 21 जनावरे मयत झाली असुन 53 घरांची पडझड झाली आहे. 22 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या अहवालानुसार बाधित गावांची व शेतकरी यांची संख्या शुन्य असुन शेती पिकांचे ( जिरायत,बागायत,फळबाग) नुकसान देखील शुन्य अर्थात निरंक दाखवले गेले आहे. पावसाने सगळीकडे हाहाकार केला असुन नदी, नाले, ओढे, धरणे तुडुंब वाहत आहे, सगळीकडे पिकांचे नुकसान झालेले असताना प्राथमिक अहवाल मात्र शुन्य आहे. पंचनाम्याची टक्केवारी सुद्धा शुन्य दाखवली आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे स्वतः परंडा येथे तळ ठोकून असुन पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. 21 सप्टेंबरची प्रशासनाने किमान नजर अंदाजे तरी नुकसान दाखवायला हवे होते. शेतकऱ्यांचे संसार पाण्यात असुन मदतीची आस लागून राहिली आहे

आठवड्याच्या दर मंगळवारी अर्थात उद्या 23 सप्टेंबर रोजी राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक आहे, त्या बैठकीत मदतीसाठी काही निर्णय होऊ शकतो. बाधित गावे, नुकसान व पंचनामे यांची प्राथमिक माहिती योग्य पाठवली तर विशेष बाब म्हणुन सरकार काही मदतरुपी विचार करून दिलासा देऊ शकते मात्र अहवालच निरंक अर्थात शून्य गेला तर सरकार तरी काय करणार ? सरकारला दाहकता कशी कळणार ? असा सवाल उपस्थितीत होत आहे. यात दोष प्रशासनाचा की सरकारचा ? की शेतकऱ्यांच्या नशिबाचा ?
भुम तालुक्यातील चिंचोली येथील देवगनाबाई नवनाथ वारे, वय 70 यांचे राहत्या शेडमध्ये पुराचे पाणी आल्याने बुडून मृत्यु झाला. भुम तालुक्यातील 3 गावातील 6 कुटुंबातील 14 पुराचे पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. लाखी गावातील 12 व्यक्ती बोटीने सुखरूप सुरक्षित स्थळी आणण्यात आले. देवगाव येथील 28 व्यक्ती हेलिकॉप्टरने सुखरूप सुरक्षित स्थळी आणण्यात आले. रुई येथील 13 व्यक्ती बोटीने सुखरूप स्थळी आणण्यात आले. परंडा तालुका येथील घाटपिंपरी ,वागेगव्हाण, वडनेर येथे अडकलेल्या व्यक्तींकरिता एनडीआरएफ टीम आलेली असुन सैन्याची टीम येत आहे. परंडा येथील 150 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.