धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा अंदाजे 92 गावांना फटका बसला असुन 64 हजार 29 शेतकऱ्यांचे 62 हजार 985 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला आहे. पुराच्या पावसात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यास प्रशासनाचे प्राधान्य असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्यासह सर्व महसुल यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असुन बचावकार्य सुरु आहे, 65 नागरिकांची सुटका केली आहे. आगामी 2 दिवस पावसाचा अलर्ट असल्याने नुकसानीचे पंचनामे करून एकत्रित अहवाल पाठवला जाईल असे प्रशासनाकडुन सांगितले जात आहे. भुम परंडा उमरगा या तालुक्याला मोठा फटका बसला आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे स्वतः परंडा येथे तळ ठोकून असुन पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. महसूल, कृषी, आपत्ती व्यवस्थापणासह सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिली.
प्रशासनाने 21 सप्टेंबर रोजी नुकसानीत निरंक अर्थात शुन्य अहवाल दिला होता मात्र त्यानंतर त्यात दुरुस्ती करून प्राथमिक अहवाल सादर केला आहे. 22 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पूर्वीच्या अहवालानुसार बाधित गावांची व शेतकरी यांची संख्या शुन्य होती, शेती पिकांचे ( जिरायत,बागायत,फळबाग) नुकसान व पंचनामे टक्केवारी देखील शुन्य अर्थात निरंक होती मात्र त्यात बदल केला आहे, त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ बैठकीतील मदतीची काहीतरी घोषणा होईल अशी आशा आहे.
बचावकार्य वेगाने सुरू – 65 नागरिकांची सुखरूप सुटका
पूरग्रस्त भागात इंडियन आर्मी, एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवान दाखल झाले असून हेलिकॉप्टर व बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 65 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.यामध्ये लाखी गावातील 12 जणांना बोटीने,रुई येथील 13 जणांना बोटीने,वडनेर-देवगाव (खु.) येथील 26 जणांना हेलिकॉप्टरने,भूम तालुक्यातील तांबेवाडीतील 6,इट येथील 1 व इडा येथील 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.परंडा तालुक्यातील घाटपिंपरी,वागेगव्हाण व वडनेर परिसरात सुमारे 150 नागरिकांची जवानांनी सुटका केली. देवगाव (खु.) येथे परंडाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे पूरग्रस्त भागात असून यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे,तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह महसूल,पोलीस व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पूरग्रस्त भागात तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.ते पूरग्रस्त भागातील गावात पाहणी करत आहेत.
पाझर तलाव फुटले – हवामान विभागाचा इशारा
भूम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक पाझर तलाव फुटले असून वारेवडगाव,पाठसांगवी,हिवरडा, वालवड चुंबळी,मोहितेनगर वालवड व वालवड पाझर तलाव बाधित झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी जनावरे व कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.