नवरात्र काळात मंचकी निद्रेमुळे सिंहासन पुजा होणार नाहीत – इतर दिवशीच्या पुजेसाठी ड्रा पद्धत
तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पुजा ऑक्टोबर महिन्यात 13 दिवस बंद असणार आहेत,नवरात्र काळातील निद्रेदिवशी देवीच्या सिंहासन पुजा होणार नाहीत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडुन जारी करण्यात आले आहे.
तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 6 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार आहे.घटस्थापना पुर्वी देवीची मंचकी निद्रा 7 ते 14 ऑक्टोबर व दसरा नंतर 24 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत मंचकी निद्रा असणार आहे, या काळात देवी सिंहासनावरून शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाणार आहे त्यामुळे सिंहासन पुजा होणार नाहीत. ऑक्टोंबरमधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात. श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर http://shrituljabhavani.org उपलब्ध करुन देण्यात येत आहे.सिंहासन पूजा नोंदणी 26 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 पर्यंत करता येईल त्यानंतर ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने सोडत काढली जाईल असे मंदीर संस्थानने कळविले आहे. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात येईल.भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे.
भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात येणार आहे.
भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. माहे सप्टेंबर 2023 या महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिध्द करण्यात येईल.