धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे तुर डाळ खिचडी या पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये तळलेला बेडूक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील बालकांसाठी एनर्जी डेन्स म्हणुन तुर डाळ खिचडी पॉकेट दिले जातात मात्र त्या पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये चक्क तळलेला बेडूक सापडला आहे. अधिकारी यांनी भेट देत पंचनामा केला असुन तसा अहवाल सादर केला आहे.
पाडोळी येथील पुनम सौदागर जाधव यांना हे आहाराचे पॉकेट देण्यात आले होते, लहान मुलांना खिचडी बनवण्यासाठी त्यांनी हे पॉकेट उघडले असता त्यात तळलेला बेडूक दिसून आला त्यानंतर त्यांनी ही बाब गावातील इतर लोकांना सांगितल्यावर विस्तार अधिकारी पंजरवाडकर व पर्यवेक्षिका सुकाळे यांनी गावात भेट दिली व त्याचा पंचनामा केला व ते पॉकेट सील केले. जुलै ऑगस्ट 24 च्या पोषण आहारात एका बॅचच्या पॉकेटमध्ये हा प्रकार उघड झाला.
पाडोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य सतीश एकंडे यांनी याची माहिती अधिकारी यांना देत झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करीत कडक कारवाई करण्याची मागणी केली. वामन गाते, विरभद्र शिराळ,सौदागर जाधव, मीना कांबळे, सविता ढाकरे,संगीता दाताळ, पुनम जाधव, स्वाती ढोबळे, अनिता जाधव,महादेव जाधव, नानासाहेब कांबळे, भारत बोचरे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. पोषण आहार निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी असताना आता त्यात बेडूक सापडल्याने खळबळ उडाली असुन बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.