धाराशिव – समय सारथी
वर्गणीसाठी जोर जबरदस्ती कराल तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे. याबाबत पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक काढले असुन तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन येथील अधिकारी, बीट अंमलदार यांचे मोबाईल नंबर प्रसारित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटींग हॉल येथे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या अध्यक्षते खाली धाराशिव जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून जोर-जबरदस्तीने व अरेरावी करुन वर्गणी घेतली जात असल्याबाबत तक्रार मांडली, कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी केली.
पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, धाराशिव जिल्ह्यात जोर जबरदस्ती चालणार नाही. कोणत्याही वर्गणीबाबत कोणी असामाजिक घटक जोर जबरदस्ती करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याबाबत निर्भय होवून तक्रार दाखल करण्याबाबत सांगितले. सदर तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल असे सांगितले. पोलीस स्टेशन येथील अधिकारी, बीट अंमलदार यांचे मोबाईल नंबर प्रसारीत करण्यात येतील. तसेच धाराशिव जिल्ह्यात व्यापारी पेठांमध्ये पोलीसांची पेट्रोलिंग वाढविली जाणार असुन visible policing केली जाणार असल्याबाबत आश्वासित केले. बैठकी करिता पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी हजर होते.