धाराशिव – समय सारथी
शेतकऱ्यांच्या सोयाबीन वा इतर मालाला जास्त भाव देतो असे सांगून शेतकऱ्यांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस दलातील कर्मचारी नानासाहेब भोसले याला अटक करण्यात आली असुन कोर्टाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शेतकरी यांच्या तक्रारी नंतर नाना भोसले याच्या विरोधात बेंबळी पोलिसात कलम 420, 417 अन्वये 12 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता, तेव्हापासुन भोसले हा फरार होता.
रुईभर येथील शेतकरी नागनाथ वडवले यांच्यासह अन्य शेतकरी यांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसात तक्रार देत गुन्हा नोंद करण्यात आला. नाना भोसले याने आडत दुकानापेक्षा जास्त भाव देतो असे आमिष शेतकऱ्यांना दाखविले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा, ज्वारी भोसले याला दिली तेव्हा त्याने विश्वास संपादन करण्यासाठी 11 शेतकऱ्याचे निम्मे पैसे तात्काळ दिले, त्यानंतर रुईभर वा बरमगाव येथील 33 शेतकऱ्यांचा विश्वास मिळवून 2022 साली 520 क्विंटल हरभरा प्रति 5 हजार दराने घेतला. 263 क्विंटल सोयाबीन 10 हजार दराने घेतले अश्या प्रकारे 50 लाख रुपयांचा शेतीमाल घेतला. या मालाचे पैसे 30 दिवसात देतो असे सांगून त्यांनी एका बँकेचा चेक शेतकऱ्यांना दिला.
बँकेत पैसे नसल्याने सदरील चेक वटला नसल्याने त्यांनी नंतर पैसे देतो असे सांगून वेळ मारून नेली वा नंतर 500 रुपयाच्या बॉण्डवर लोकांचे पैसे देतो असे लिहून दिले. त्यानंतर पुन्हा चेक वटला नाही, त्यामुळे वडवले यांनी बहिणीचा प्लॉट विकून काही पैसे शेतकऱ्यांना दिले. भोसले यांना वारंवार पैसे मागुन सुद्धा त्यांनी न दिल्याने अखेर गुन्हा नोंद केला त्यानंतर तब्बल 7 महिन्यांनी अटक करण्यात आली. पोलीस याचा तपास करीत आहेत.