तुळजापुर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धाराशिवचा स्थानिक गुन्हे शाखा सतर्क होती. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नळदुर्ग तुळजापुर बायपास रस्त्यावर कारवाई करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सपोनि अमोल मोरे व सचिन खटके यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी संशयित कार (क्र. एमएच 11 एके 9621) तपासली असता, आरोपींच्या ताब्यातून दरोडा टाकण्यासाठी वापरायचे साहित्य व धारदार कोयता जप्त करण्यात आला. रोहीत उर्फ तात्या अंकुश गायकवाड (36, रा. सुभाष कॉलनी, बीड) अमर आसाराम गायकवाड (23, रा. नळवंडी नाका, बीड) राजेश अभिमान जाधव (27, रा. च हाटा, बीड) राजाभाऊ ज्ञानदेव यादव (25, रा. वांगी, बीड) व प्रशांत दिलीप डाके (25, रा. स्वराज्य नगर, बीड) यांना अटक केली.
पोलिस तपासात आरोपींवर यापूर्वी दरोडा, चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपींविरुद्ध तुळजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 349/2025 भा.न्या.सं. कलम 310(4), 310(5) व शस्त्र अधिनियम 4/25 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कामगिरी अमोल मोरे, सचिन खटके, विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, दत्ता राठोड, दया गादेकर, नितीन जाधवर, बबन जाधवर, शोभा बांगर, यादव, आंधळे, महेबुब अरब, सुभाष चौरे, विनायक दहीहंडे आदींनी केली.