ठाकूर व गोळे हे 2 आरोपी 10 महिन्यापासुन फरार
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवाल याला मुंबई येथील अटक केल्यानंतर धाराशिव कोर्टाने 2 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ती कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा धाराशिव कोर्टासमोर हजर करण्यात आले यावेळी त्याला 2 दिवसांची रविवारपर्यंत वाढीव पोलिस कोठडी देण्यात आली.
अग्रवाल याला अटक केल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असुन पोलिसांना महत्वपुर्ण पुरावे मिळाले आहेत. तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकूर हे तपास करीत असुन जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात सरकारची बाजु मांडली.

ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या 39 झाली असुन त्यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी 14 आरोपी मर्यादित चार्जशीट कोर्टात पाठवले होते त्यानंतर तपास सुरूच आहे, तपासाअंती पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. ड्रग्ज तस्करीतील आरोपी संगीता गोळे व संतोष खोत या 2 आरोपीच्या जबाबात, ते अतुल अग्रवाल याच्याकडुन अनेक वर्षापासुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याची कबुली दिली होती त्यानंतर अग्रवाल याचे नाव समोर आले. त्याचा नंबर, पत्ता ठावठिकाणा नसताना तांत्रिक तपासाआधारे त्याला शोधून अटक केली.
धाराशिव पोलिसांनी अग्रवाल याला मुंबई येथील मीरा भाईंदर येथून अटक केली. अग्रवाल हा मुळचा राजस्थान येथील रहिवासी असुन तो गेली जवळपास 20 वर्ष मुंबईत स्थायीक आहे. तो मीरा भाईदर या भागात एका लॉंड्रीच्या दुकानाच्या आडून ड्रग्जचा काळाबाजार करीत होता. 2004 पासुन त्याच्यावर ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद आहेत.
पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर यांनी तपास पथक गठित केले होते. यात पीएसआय प्रदीप टेकाळे, पोलिस हवालदार सूरज नरवडे आणि गोपाळ सलगर यांचा समावेश होता.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी अतुल अग्रवाल याला पोलिस कधी अटक करणार असा सवाल करीत मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन दिले होते तर आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला होता त्यानंतर अतुल अग्रवाल प्रकरण राज्यभर गाजले होते.
मुख्य संशयित आरोपी वैभव गोळे व नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी गेली 10 महिन्यापासुन फरार असुन ते पोलिसांना गुंगारा देत आहेत, त्यांना पकडणे हे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गोळे हा ड्रग्ज तस्करीत असुन त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत तर ठाकूर याचे जिल्ह्यात अनेक कारनामे असुन तो पोलिसांचा ‘खबरी’ व नियमित लागेबांधे असल्याने त्याला ‘अभय’ मिळत असल्याची चर्चा होत आहे. ठाकूर व गोळे याला अटक कधी करणार हे पाहावे लागेल.












