धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य सुत्रधार सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू अप्पासाहेब मुळे व मुंबई येथील तस्कर संतोष अशोक खोत या 2 आरोपींची 14 दिवसांची पोलिस कोठडी 13 मार्चला संपणार आहे. संगीता गोळे हिचा साथीदार मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत याला 27 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे तर तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ पिंटू मुळेला 28 मार्चला अटक करण्यात आली. एकेकाळी कर्जबाजारी ते करोडोपती असा मुळे याचा प्रवास असुन पिंटूने तुळजापूरला सर्वप्रथम ड्रग्ज आणले. 3 वर्षापासुन तो व मुंबईतील टोळी तुळजापुरात तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. ड्रग्ज खरेदीसाठी पैसे कुठून आले? फायनान्सर, किती अवैध मालमत्ता कमावली याचा तपास करीत असुन त्यात काय निष्पन्न झाले हे लवकरच कळणार आहे.
ड्रग्ज क्वीन संगीता गोळे हिच्या वाढीव पोलिस कोठडीत नवीन आरोपी, फारसे काही अपेक्षित समोर आले नाही. डिसेंबर महिन्यात ड्रग्ज तस्करी बाबत पहिली ठोस माहिती मिळाली, दुर्दैवाने 2 वेळेस ट्रॅप अपयशी ठरला मात्र तिसऱ्या वेळी यश आले असे सांगत कारवाई आपल्यामुळे झाल्याचा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला होता. 4 मार्चपासुन कोणतीही नवीन लिंक किंवा आरोपी पोलिस तपासात निष्पन्न किंवा अटक झाले नसल्याचे कागदपत्रानुसार दिसते. आमदारांचा जनसंपर्क व माहितीचे मोठे जाळे असल्याने त्यांच्या ‘टीप’ची पोलिसांना मदत होऊ शकते असा विश्वास तुळजापुरकरांना आहे. आरोपी कोण आहे ? कोणत्या पक्षाचा आहे ? जवळचा आहे की दूरचा आहे याचा विचार न करता कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत कोणाकडे आणखी माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी न डगमगता आपल्याला कळवावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते, त्यानंतर आमदार यांच्याकडे काही माहिती आली असेल व ती त्यांनी पोलिसांना दिली असेल अशी आशा तुळजापुरकरांना आहे.