धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या हत्याकांडातील सर्व 9 आरोपींचा युक्तिवाद संपला असुन आता आरोपीच्या युक्तिवादावर सीबीआय उत्तर देणार आहे. हत्याकांड सुनावणी अंतीम टप्प्यात असताना मुख्य आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांनी त्यांच्या वकीलामार्फत सीबीआय व मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासाची काही कागदपत्रे मागितली होती व त्याआधारे काही म्हणणे मांडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली होती मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. हा खुन खटला आता निकालाच्या अंतीम टप्प्यात आहे. खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात याची सुनावणी सुरु आहे. दुहेरी हत्याकांड खटल्याचा निर्णय मे 2025 अखेर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पुढील सुनावणी 6 मार्चला होणार आहे.
अशी झाली आरोपीना अटक – आरोपी पारसमल जैन जो की या दुहेरी हत्याकांडात माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी या हत्याकांडातील मुख्य आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री तथा तत्कालीन विद्यमान खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांना सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग यांनी मुंबईतुन अटक करण्यात आली. सीबीआयने मुख्य आरोपी म्हणुन अटक केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. 15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. हत्याकांडातील आरोपी पिंटू सिंग व दिनेश तिवारी हे दोन्ही शुटर अजूनही जेलमध्ये असुन इतर सर्व आरोपी जामीनावर आहेत.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. 4 जुलै 2011 पासुन सुमारे साडे 13 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व त्यांचे बंधु जयराजे निंबाळकर हे 3 जुन 2006 साली वडिलांची हत्या झाल्यानंतर न्याय मिळावा यासाठी गेली 19 वर्ष कायदेशीर लढा देत आहेत. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने डॉ पाटील यांच्यासह 9 जणांच्या विरोधात कोर्टात 5 हजार पानाचे चार्जशीट कोर्टात सादर केले त्यात पवनराजे यांची हत्या राजकीय वर्चस्वातुन झाल्याचा ठपका ठेवला, 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे.