लोकसभा विजयानंतर विधानसभा निकालापर्यंत गप्प रहा, पारसमलला वाऱ्यावर सोडले, गुन्हे नोंद केल्याने ‘बिंग’ फुटले
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडात पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार असुन त्याने कोर्टात दिलेल्या जबाबात अनेक गंभीर आरोप व धक्कादायक खुलासे केले आहेत. जैन याने सुनावणी दरम्यान मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांवर शरद पवार म्हणजे ‘बाबा’, अजित पवार ‘दादा’ व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री जयंत पाटील यांचा दबाव होता. डॉ पद्मसिंह पाटील यांना वाचवण्यासाठी मी गप्प राहावे म्हणून 3 वेगवेगळ्या गुन्ह्यात गुंतवले मात्र एकामागून एक खोटे गुन्हे नोंद होत असल्याने पवनराजे हत्याकांडाचे ‘बिंग’ मुलगी वर्षा मार्फत सीबीआयला ‘पत्र’ लिहून उघड केले असल्याचे जैन याचे म्हणणे आहे.
3 जुन 2006 रोजी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर व समद काझी यांची हत्या झाल्यानंतर 8 फेब्रुवारी 2009 पर्यंत जवळपास 2 वर्ष 8 महिने सगळे काही अलबेल होते, 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे सोपवुनही आरोपी किंवा कोणताही धागादोरा हाती लागला नव्हता. जैन याच्या 1 सप्टेंबर 2021 च्या कोर्टातील जबाबानुसार, तो 8 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता मुंब्रा येथील एका क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेला, तेव्हा तिथे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला व त्याला पकडले.त्यानंतर त्याने किती दरोडे टाकले याबाबत चौकशी सुरु केली. मी दरोडा नाही तर पवनराजे यांचा खुन केल्याची कबुली देत डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वांची नावे सांगितली आणि इथूनच खरा ‘खेळ’ सुरु झाला.
हत्याकांडातील इतर आरोपीना पकडून दे, तुला सर्व काही देऊ असे आमिष दाखवत त्याला कायदेशीर अटक न करता 11 ते 17 फेब्रुवारीपर्यंत तसेच ठेवले. 18 फेब्रुवारीला मध्यप्रदेश येथे नेले, जैन याने 23 फेब्रुवारीला दिनेश तिवारीला पकडून दिले. कैलास यादव हा बाहेर निघताना 30 ते 40 शस्त्रधारी माणसे घेऊन फिरतो त्यामुळे त्याला लगेच अटक करणे शक्य नसल्याचे सांगितल्याने जैन, तिवारी यांसह पथक मुंबईला आले. 25 फेब्रुवारीला जैन व तिवारी याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर 9 मार्च 2009 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली.
कुर्ला गुन्हे शाखेत घेऊन गेल्यावर पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड जैनला म्हणाले की, पारस तु खुप नशीबवान आहेस. आम्ही तुझ्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला नाही. मारिया यांच्यावर ‘बाबा’, ‘दादा’,गृहमंत्री जयंत पाटील, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दबाब आहे. पद्मसिंह पाटील हे लोकसभेची निवडणुक लढवणार असुन ते जिंकले तर केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येईल तेव्हा आम्ही तुझ्यावर खुनाचा गुन्हा नोंद करणार नाहीत म्हणून तोपर्यंत आर्म ऍक्टचा गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर 9 मार्च 2009 ला जैन व तिवारीवर दरोड्याचा गुन्हा त्यानंतर 13 एप्रिलला चोरीचा गुन्हा नोंद केला, त्यात 20 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
पोलिस कोठडीत पोलिस निरीक्षक दिनेश कदम म्हणाले की, तुम्ही जामिनीसाठी अर्ज करू नका अश्या मारिया यांच्या सुचना आहेत. मी दरोडा चोरी केली नाही मग गुन्हा का ? तुम्ही मला, डॉ पाटील व इतर आरोपीना खुनाच्या गुन्ह्यात का अटक करत नाहीत? डॉ पाटील यांना अटक कधी करणार ? तेव्हा कदम म्हणले की आम्ही दरोडा गुन्ह्यात पर्याप्त पुरावा नसल्याने 169 फायनल करणार आहोत व तुला जमीन देऊ मात्र तु विधानसभा निवडणुका संपेपर्यंत शांत रहा. कोणाला काही बोलू नकोस. डॉ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे विधानसभा निवडणुक लढवणार असुन त्याचा निकाल लागला की आम्ही तुला जामिनावर सोडू.
लोकसभा निवडणुक निकाल लागून डॉ पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीकडून खासदार झाले मात्र त्यांच्या वतीने कोणीही मला व तिवारी याला भेटायला जेलमध्ये आले नाही. आमच्यावर खोटे गुन्हे नोंद होत असल्याने मी माझी मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दे असे म्हणालो त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 ला पत्र दिले. त्यानंतर आम्ही माझ्यावर किती गुन्हे नोंद आहेत यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली मात्र पोलिसांनी ती दाखल करू नका म्हणाले. माझ्या मुलीने सीबीआयकडे तक्रार केल्याने मारिया यांनी 5 मे रोजी सीबीआयला मी व तिवारी याने दरोड्याच्या गुन्ह्यात तपासावेळी पवनराजे हत्याकांडाची कबुली दिल्याबाबतचे लेखी पत्र दिले .
पारसमल जैन याने मारिया व त्यांच्या टीममधील मिलींद गायकवाड,प्रवीण भगत,अनिल वडवणे,दिलीप रुपवते,दिनेश कदम यांच्यासह अन्यजणावर डॉ पदमसिंह पाटील याना वाचवण्यासाठी हत्याकांड दडपून ठेवल्याचा आरोप केले आहे, जो की गंभीर आहे. मारिया यांनी 5 मे रोजी सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग यांना पत्र दिले त्यानुसार जैन व तिवारी याने 19 एप्रिलला हत्याकांडाची कबुली दिली मात्र बंदोबस्त व इतर बाबीमुळे कळवण्यास उशीर झाला. हत्याकांड सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीनी कबुली देऊनही तब्बल 15 दिवसांनी पत्र दिले, यातील काही बाबीमुळे संशय निर्माण झाला आहे.